नागोठणे उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार, गणेशोत्सवात छोट्या वाहनधारकांना मुंबई-गोवा महामार्गावर दिलासा मिळण्याची चिन्हे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि कोंडीमुक्त होण्यासाठी माणगाव व इंदापूर बायपासची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिले. तसेच नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांचा तसेच वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठक आयोजित केली होती. पनवेल ते इंदापूर तसेच इंदापूर ते झाराप या मार्गावरील कामांचा आढावा घेताना माणगाव आणि इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

टोलमाफीसाठी गडकरींना साकडे

गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीचा विचार करून महामार्गावरील टोलमाफीच्या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट संपर्क साधून आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

खारपाडा टोल स्थगित करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथे होणारी टोल आकारणी स्थगित करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी अपेक्षित सोयीसुविधा पूर्ण झालेल्या नसताना खारपाडा येथे होणारी टोल आकारणी बंद व्हावी, अशी मागणी तटकरे यांनी निवेदनाद्वारे केली. गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करावे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

Comments are closed.