MPL 2025: रायगड रॉयल्सचा थरारक विजय, सातारा वॉरियर्स स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (17 जून) रायगड रॉयल्स विरुद्ध सातारा वॉरियर्स असा सामना खेळला गेला. सायंकाळच्या सत्रात झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे प्रत्येकी दहा षटकांच्या झालेल्या या सामन्यात रायगड रॉयल्सने दोन धावांनी रोमांचक विजय मिळवत, महत्त्वाचे दोन गुण आपल्या खात्यात जमा करून घेतले.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी दहा षटकांचा करण्याचा निर्णय घेतला गेला. रायगड रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना तीन फलंदाजांच्या बदल्यात 85 धावा केल्या. या सामन्यात रायगडने अष्टपैलू विकी ओस्तवाल याला सलामीला उतरवले. मात्र, तो केवळ आठ धावांचे योगदान देऊ शकला. दुसरा सलामीवीर सिद्धेश वीर याने अखेरपर्यंत नाबाद राहत 23 चेंडूत 33 धावा केल्या. दिग्विजय पाटील याला 18 चेंडूत 16 धावा केल्यानंतर रिटायर्ड आऊट केले गेले. तर, नीरज जोशी याने 12 व‌ कर्णधार ऋषभ राठोड याने 11 धावांचे योगदान दिले. सातारा संघासाठी राजवर्धन हंगरगेकर व समाधान पगारे यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी मिळालेल्या 94 धावांचा पाठलाग करताना सातारा संघाचे सलामीवीर पवन शहा व‌ ओम भोसले अनुक्रमे तीन व चार धावा करून माघारी परतले. त्यांच्याप्रमाणेच मधल्या फळीतील व‌ खालच्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केली. हर्षल काटे याने अखेरपर्यंत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. त्याने 24 चेंडूत चार चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद 45 धावा केल्या. त्याला केवळ वैभव चौगुले याने 16 धावा करून साथ दिली. अखेरच्या दोन षटकात रायगडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Comments are closed.