MPL 2025: क्वालिफायरमध्ये पोहोचतात रायगड रॉयल्सने केले भारी सेलिब्रेशन, व्हिडिओ झाला व्हायरल
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये शुक्रवारी (19 जून) रायगड रॉयल्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स असा एलिमिनेटर सामना खेळला गेला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात रायगडने दोन चेंडू राखून विजय मिळवला. यासह त्यांची क्वालिफायर 2 मधील जागा निश्चित झाली. या शानदार विजयानंतर संपूर्ण रायगड रॉयल्स संघ ड्रेसिंग रूममध्ये खास सेलिब्रेशन करताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये दाखल होणार होता. या सामन्यात रायगडने उत्कृष्ट सांघिक खेळ दाखवत 6 गडी राखून विजय मिळवला. रायगड संघ प्रथमच स्पर्धेच्या प्ले ऑफ्समध्ये दाखल झाला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. संघाच्या या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये आनंददायी वातावरण होते. ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यावर खेळाडूंनी एकत्रित येत रावडी राठोड चित्रपटातील ‘चिंता ता चिता चिता’ या गाण्यावर ठेका धरला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एलिमिनेटर सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 164 धावा उभ्या केल्या होत्या. कोल्हापूरसाठी अनुभवी अंकित बावणे याने अर्धशतक झळकावले. तर सिद्धार्थ म्हात्रे याने 31 धावांचे योगदान दिले होते. रायगडसाठी निखिल कदम याने सर्वाधिक तीन बळी मिळवली. या धावांचा पाठलाग करताना विकी ओस्तवाल व सिद्धेश वीर या रायगडच्या सलामी जोडीने 69 धावा उभ्या केल्या. सिद्धेश याने 39 धावांचे योगदान दिले. तर, विकी ओस्तवाल याने 74 धावा बनवल्या. नीरज जोशी याने नाबाद 37 धावा करत संघाचा विजय साकार केला. शानदार अर्धशतक झळकावणारा विकी ओस्तवाल सामन्याचा मानकरी ठरला.
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रायगड रॉयल्स आणि पुणेरी बाप्पा भिडणार आहेत. या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. शनिवारी सायंकाळी सात वाजता हा सामना खेळला जाईल. विजेता संघ रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्ससोबत दोन हात करेल.
Comments are closed.