Raigad Shivarajyabhishek Day Coronation ceremony Raigad Fort Chhatrapati Shivaji Maharaj Raigad district Eknath Shinde Bharat Gogawale
महाड : अवघ्या चार दिवसांत किल्ले रायगडावर पुन्हा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचा जल्लोष झाला. 6 जून रोजी तारखेप्रमाणे आणि 9 जून रोजी तिथीप्रमाणे राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. या दोन्ही दिवशी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. सोमवारी बहुतांश शिवप्रेमी शिवकालीन वेशभूषेत रायगडावर आल्याने या दृष्याने सारे भारावून गेले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आसमंतात दुमदुमला. तुतारींतून निघालेल्या ललकारी, ढोलताशांचा गजर आणि विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषाने मंगलमय झालेल्या रायगडावरील वातावरणात शिवरायांच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. वरुणराजाने देखील हजेरी लावून आसमंतातून रायगडावर जलाभिषेक केला.
शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकणकडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे सोमवारी 352 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार महेंद्र थोरवे, खासदार श्रीधर बारणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार रुपेश म्हात्रे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या सीईओ नेहा भोसले, हिरोजी इंदलकर यांचे वंशज बांदल, समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकणकडा मित्र मंडळाचे सुरेश पवार आदी उपस्थित होते.
रायगडाची गडदेवता शिरकाई मातेच्या पूजनाने या सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. भरत गोगावले यांनी सपत्नीक पूजा केली. राजसदरेवरील मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आली होती. रात्री शाहिरी पोवाडे, जगदंबेचा जागर व गोंधळाने रायगडावर रंगत आली. पहाटे साडेवाजता ध्वजारोहण सोहळा आणि श्री शिवप्रतिमापूजन करण्यात आले.
गडावरील विविध देवी-देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी शिवरायांच्या मूर्तीची पालखी सदरेवर वाजत गाजत आणण्यात आली. या मिरवणुकीत महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. गडावर विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषाने रायगडाच्या कडेकपारी रोमांचित झाल्या होत्या. पावसाचा गारवा व दाट धुक्यातही शिवप्रेमींमधील अलोट उत्साह दिसत होता.
हेही वाचा… Mumbai Goa Highway : अशी फुटणार माणगावजवळील वाहतूक कोंडी, एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले
ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात वेद उच्चारासोबत सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्टीत करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाणी आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंच्या पाण्याने जलाभिषेकही करण्यात आला. हा क्षण सदर, होळीचा माळ, बाजारपेठ येथे उपस्थित असलल्या हजारो शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला नेऊन ठेवणारा होता. राज्याभिषेकानंतर हलगी, ढोलताशे, लेझीम, मुदमंगाच्या वाद्यात, शिवजयघोषात शिवप्रेमींच्या उत्साहात शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक राजसदरेहून होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर अशी काढण्यात आली. होळीच्या माळावर दांडपट्टे, लाठीकाठी, तलवारबाजी असा मर्दानी खेळा बरोबरच लेझीम सादरीकरणही दिमाखात करण्यात आले.
(Edited by Avinash Chandane)
Comments are closed.