ढोलताशांचा गजर.. शाहिरांची ललकारी.. मर्दानी खेळ, तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

शाहिरांची ललकारी.. मर्दानी खेळ आणि ढोलताशांचा गजर यामुळे आज किल्ले रायगडावर जणू शिवकाळ अवतरला. निमित्त होते तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे. पारंपरिक वेशात भगवे झेंडे हातात घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिवभक्त हिंदवी स्वराज्याच्या राजधानीमध्ये दाखल झाले होते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज शके 352 या मुहूर्तावर लाडक्या राजाला मंत्रोच्चाराच्या जयघोषात सुवणर्णाभिषेक करण्यात आला तेव्हा महाराजांच्या जयजयकाराने अवघा रायगड दुमदुमून गेला होता.
शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड व कोकणकडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी सहा वाजल्यापासून मंगलमय वातावरणात विविध कार्यक्रमांचा शुभारंभ झाला. साडेसहा वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यानंतर मुख्य राजसदरेकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. नगारखान्यासमोर असणाऱ्या भव्य अशा भगव्या ध्वजाचेही ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राजसदरेवर सुवर्णाभिषेक करण्यात आला.
रायगड पोलीस दलाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. राज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे जगदिश्वर मंदिराकडे प्रस्थान झाले तेव्हा वाजतगाजत शाही शोभा यात्रा निघाली. या शोभायात्रेमध्ये शिवकालीन पोशाख परिधान केलेले मावळे, भगवे ध्वज यामुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. होळीचा माळ, जगदिश्वर मंदिर, समाधीस्थळ व राजसदर येथील परिसर शिवभक्तांनी फुलून गेला होता. राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत किल्ल्यावरील परिसर स्वच्छ
तरुणींचे लेझीम, पोवाडे आणि आरती
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून तरुणींचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. त्याशिवाय शाहिरांनी मारलेली डफावरची थाप प्रेरणादायी होती. तसेच ‘जय जय शिवछत्रपती राजे’ या आरतीचे सूरही किल्ल्यावर गुंजले. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी अनेक अधिकारी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी उपस्थित होते.
Comments are closed.