मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत
बिहारमधील जमुई येथे अपघात : अनेक गाड्या वळवल्या
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार-झारखंड सीमेवर शनिवारी रात्री रेल्वे अपघात झाला. जमुई येथे मालगाडीचे 19 डबे रुळावरून घसरले. त्यापैकी 10 डबे पुलावरून कोसळल्याचे सूत्रांकडून समजते. तथापि, अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केलेली नाही. रेल्वे अपघातामुळे अप आणि डाउन दोन्ही विभागांवरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या विविध ठिकाणी अडकल्या आहेत. वंदे भारतसह अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. मालगाडी एका कल्व्हर्टवर रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच स्थानिक प्रवासी रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांना अडचणी येत आहेत.
झाझा-जसिदीह रेल्वेमार्गावरील जमुई जिह्यातील सिमुलतलाजवळील तेलवा हॉल्टजवळील बरुआ नदीच्या पुलावर शनिवारी रात्री उशिरा एक मोठा रेल्वे अपघात झाला. जसिदीहहून झाझा येथे सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी अचानक रुळावरून घसरली. या अपघातात एकूण 19 डबे रुळावरून घसरले, तर 10 डबे थेट पुलावरून खाली पडले. ही घटना रात्री 11:30 च्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे. आसनसोल रेल्वे विभागांतर्गत असलेल्या जसिदीह-झाझा मुख्य रेल्वे मार्गावरील पूल क्रमांक 676 आणि पोल क्रमांक 344/18 जवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे तांत्रिक विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. आसनसोल रेल्वे विभागाचे डीआरएम देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले होते.
Comments are closed.