5 वर्षांपासून रेल्वे भाडे वाढलेले नाही

संसदेत रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती : पाकिस्तान-बांगलादेशचा उल्लेख

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दीर्घ अंतराच्या आरामदायी प्रवासाकरता भारतीय रेल्वेपेक्षा चांगला पर्याय नाही. अनेक सुविधांसोबत रेल्वेचा प्रवास किफायतशीर देखील आहे. मागील 5 वर्षांपासून भारतीय रेल्वेने प्रवासीभाड्यात कुठल्याच प्रकारची वाढ केलेली नाही. म्हणजेच तिकिटाचे दर जैसे थे आहेत अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत बोलताना मंगळवारी दिली. भारतातील रेल्वे प्रवास शेजारी देश पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा नव्हे तर पूर्ण युरोपीय देशांच्या तुलनेत सर्वात स्वस्त असल्याचे वैष्णव म्हणाले.

भारतीय रेल्वेने 2020 पासून प्रवासभाडे वाढविलेले नाही. शेजारी देशांच्या तुलनेत भारतात सध्या सर्वात स्वस्त रेल्वेभाडे आहे.  भारतात सध्या 350 किलोमीटरच्या रेल्वे प्रवासासाठी 121 रुपये खर्च करावे लागतात. तर इतक्याच अंतरासाठी पाकिस्तानात रेल्वेचे तिकीट 436 रुपये आणि बांगलादेशात 323 रुपये आणि श्रीलंकेत 413 रुपयांचे आहे. युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात रेल्वेप्रवास 20 पटीने स्वस्त असल्याचा दावा वैष्णव यांनी केला आहे.

सुरक्षेवर भार

रेल्वेसुरक्षेवर आमचा अत्यंत अधिक भर आहे. या दिशेने पावले टाकत आम्ही अनेक तांत्रिक बदल रेल्वेच्या वतीने केले आहेत. यात लाँगर रेल्वे, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फॉग सेफ्टी डिव्हाइस आणि अनेक माठी पावले उचलून भारतीय रेल्वेत सातत्याने सुधारणा केल्या जात असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

रेल्वेचा सातत्याने विस्तार

12 हजार रेल्वे फ्लायओव्हर अणि अंडरब्रिज तयार करण्यात आल्याने देशाला मोठा लाभ झाला आहे. याचबरोबर 34 हजार किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. हे प्रमाण जर्मनीच्या पूर्ण रेल्वेजाळ्यापेक्षाही अधिक आहे. 50 हजार किलोमीटरचे जुने रुळ हटवून नवे रुळ टाकले जात असल्याने सुरक्षेतही मोठी सुधारणा झाली असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.

रेल्वेचा मोठा निर्यातदार

देशात लोकोमोटिव्हचे उत्पादन, इंजिनची निर्मिती 1400 पर्यंत पोहोचली आहे. अमेरिका आणि युरोपच्या एकूण निर्मितीपेक्षाही हे अधिक प्रमाण आहे. भारत रेल्वेचा आता मोठा निर्यातदार ठरला आहे. ऑस्ट्रेलियाला मेट्रो कोच, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि फ्रान्सला रेल्वेडबे, तर मेक्सिको, स्पेन, जर्मनी, इटलीला ऑपरेशन  इक्विपमेंट पाठविण्यात येत आहे. लवकरच बिहारचा लोकोमोटिव्ह आणि तामिळनाडूत निर्मित चाकं जगात धावू लागतील असे उद्गार वैष्णव यांनी काढले आहेत.

Comments are closed.