परप्रांतीय रेल्वे पोलिसांची मराठी कुटुंबावर दादागिरी, प्रवाशांनी दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस रोखली

भाजप व मिंधे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात मराठी माणसांवरील अन्याय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज तर परप्रांतीय रेल्वे पोलिसांनी मराठी कुटुंबावर दादागिरी केल्याची संतापजनक घटना दिवा रेल्वे स्थानकात घडली. त्यामुळे चिडलेल्या प्रवाशांनी दिवा-सावंतवाडी एक्प्रेस 17 मिनिटे रोखली. दिवा स्थानकात त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. रेल्वे पोलिसांच्या या दादागिरीचा निषेध केला जात आहे.
दिवा स्थानकातून कोकणात जाण्यासाठी गाडय़ा सुटतात. मे महिन्याची सुट्टी असल्याने या स्थानकात आज चाकरमान्यांची तुफान गर्दी होती. सकाळच्या सुमारास फलाटावर दिवा-सावंतवाडी येताच सीट पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ उडाली. त्यातूनच रेल्वे पोलिसांशीदेखील बाचाबाची झाली. त्याचा फायदा काही परप्रांतीय पोलिसांनी घेऊन एका मराठी कुटुंबालाच दादागिरी करण्यास सुरुवात केली.
7 जणांवर गुन्हा दाखल
गाडीमध्ये असलेल्या अन्य मराठी कुटुंबांनी परप्रांतीय रेल्वे पोलिसाला आमच्याशी थोडे संयमाने बोला अशी विनंती केली. पण त्या परप्रांतीय पोलिसांची मुजोरी सुरुच होती. त्यामुळे प्रचंड वादावादी होऊन संतापलेल्या चाकरमान्यांनी दिवा-सावंतवाडी गाडी रोखली. त्यामुळे गाडीला खोळंबा झाला. दरम्यान रेल्वे रोखणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिवा स्टेशन मास्तर मनोज गुप्ता यांनी दिली.
Comments are closed.