पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा टी20 वर्ल्ड कपमधील प्रवास संपला; झिम्बाब्वे आणि श्रीलंका पात्र!

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा ३२ वा सामना खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे या सामन्यात नाणेफेक (टॉस) देखील होऊ शकली नाही. सततच्या पावसामुळे अखेर सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. यासह झिम्बाब्वेच्या संघाने ‘सुपर ८’ साठी आपले स्थान निश्चित केले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा या आयसीसी स्पर्धेतील प्रवास संपला आहे.

​श्रीलंकेत पावसामुळे अनेक सामन्यांवर परिणाम झाला आहे. या सामन्यातही जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे शेवटी पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने स्पर्धेत आधीच २ विजय नोंदवले होते, त्यामुळे हा सामना रद्द होताच त्यांनी सुपर ८ फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, आयर्लंडचा संघ ३ गुणांसह गटात तिसऱ्या स्थानावर पोहोचला असला, तरी त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेकडून पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाचाही प्रवास आता थांबला आहे. २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ यावेळी साखळी फेरीतूनच बाहेर पडला आहे.

​ऑस्ट्रेलियाचा संघ साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना २० फेब्रुवारीला ओमानविरुद्ध खेळणार आहे. मात्र, या सामन्याला आता तांत्रिकदृष्ट्या कोणतेही महत्त्व उरलेले नाही; केवळ आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलिया ओमानविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. आयर्लंडच्या संघाने आपले सर्व सामने खेळले आहेत. तर, झिम्बाब्वेचा संघ १९ फेब्रुवारीला यजमान श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळेल. हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि या सामन्यातील विजयी संघ आपल्या गटात अव्वल स्थानी राहील.

Comments are closed.