मध्य प्रदेशात पावसाचा नाश सुरू आहे

शहडोलमध्ये 3 हजार घरात पाणी शिरले : हिमाचल, उत्तर प्रदेशातही मुसळधार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्य प्रदेशसह आजुबाजुच्या राज्यांमध्ये सध्या पावसाचा कहर सुरूच आहे. शहडोलमध्ये गेल्या 24 तासात 4 इंच पाऊस पडला. याचदरम्यान काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने मध्यरात्री 3 हजारांहून अधिक घरे पुराच्या विळख्यात अडकली. तसेच रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांना अन्यत्र हलवावे लागले. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वेमार्ग 4 तास बंद राहिला.

मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे 4 तास गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली. राजस्थानमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. झुंझुनूमध्ये बाघोली नदीच्या जोरदार प्रवाहामुळे राष्ट्रीय महामार्ग-52 ला जोडणारा रस्ता वाहून गेला. सिकरमध्ये पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच नाले तुडुंब भरून वाहत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिमाचल प्रदेशात 20 जून ते 6 जुलै दरम्यान ढगफुटीच्या 19 घटना घडल्या. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे 269 रस्ते बंद आहेत. राज्यात पावसाशी संबंधित अपघातांमध्ये आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये सोमवार सकाळपासूनच पाऊस वाढल्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. अनेक लोकांच्या घरातही पाणी शिरले होते. अयोध्येत शरयू नदी तुडुंब भरली आहे. तसेच प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नैनीचा अरैल घाट पाण्याखाली गेला आहे. घाटावर असलेली बारादरी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. खालच्या बारादरीमध्ये बांधलेल्या विश्रामगृहाचे फक्त छत दिसत आहे. प्रयागराजमध्ये गंगेची पाण्याची पातळी सुमारे 78 मीटर आणि यमुनेची 75.88 मीटर नोंदवली गेली आहे. येथे धोक्याची पातळी 84.734 मीटर आहे. घाटावर पोलीस आणि पाणबुडे तैनात करण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्तांच्या आसऱ्यासाठी आश्रयस्थाने उभारण्यात आली आहेत. तेथे अन्न, पाणी आणि औषधांची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Comments are closed.