ICC T20 WC 2026 – हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर पाऊसहल्ल्याची शक्यता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या पावणे दोनशे कोटी जनतेसह अवघे क्रिकेटविश्व ज्या क्रिकेटयुद्धाची आतुरतेने वाट पाहतेय, त्या युद्धावर पाऊसहल्ल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान पावसाने विश्रांती घ्यावी म्हणून क्रिकेटप्रेमींनी देवाकडे साकडे घातले आहे.

कोणताही वर्ल्ड कप असो किंवा आशिया कप, हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर कसले ना कसले संकट असतेच. आधीच पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्काराची धमकी दिली होती. त्यामुळे कोलंबोतल्या या सामन्याच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानने बहिष्कार मागे घेतला होता. ते संकट दूर होत नाही तोच आता पावसाच्या संकटाने सामन्याला वेढले आहे. 15 फेब्रुवारीला दिवसभर पावसाची हजेरी राहणार असून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 50 ते 60 टक्के पावसाची शक्यता आहे. यादरम्यान पाऊस किती जोरात कोसळतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळ आणि दुपारच्या तुलनेत रात्री पावसाची तुरळक शक्यता आहे. पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही तर याचा खूप मोठा आर्थिक फटका आयसीसीला बसू शकतो.

पावसाने हजेरी लावल्यानंतर स्टेडियममधील पाणी वेगात काढण्यासाठी लंकेने मोठय़ा संख्येने मदतनीसांची फौज उभारली आहे. पावसामुळे संपूर्ण सामना झाला नाही तरी किमान दहा-दहा षटकांचा तरी सामना व्हावा यासाठी क्रिकेटप्रेमींनी देवाचा धावा केला आहे. हा सामना जो जिंकेल तो संघ सर्वप्रथम सुपर एटमध्ये धडक मारेल आणि जर पावसाने खेळ बिघडवला तर दोन्ही संघांना एकेक गुण दिला जाईल.

Comments are closed.