आशा भोसले – शेवटचा सम्राट – राज ठाकरे

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक -दोन भाषणांमध्ये आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हटलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.

लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीवपणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन येणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं, तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्पं त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हटल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच. ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.

‘गाणं हे माझं पॅशन आहे’ किंवा ‘ऑक्टिंग माझं पॅशन आहे’ असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणवून घेणारे हल्ली ढिगानं आढळतात. असलं म्हणण्याची मुभा नियतीनं आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या 15व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला, पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातल्या किंतु,परंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना लतादीदींचा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशा वेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.

व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या, तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.

मी भाग्यवान आहे की, ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही, तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उलगडत राहील.

लतादीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील, ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशात कधीच अराजक आलं असतं! उत्तुंग काय असतं आणि ते कुठं बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला!

जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला! आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.

(लेखक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेअरमन आहेत.)

लतादीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील, ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशात कधीच अराजक आलं असतं! उत्तुंग काय असतं आणि ते कुठं बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला!

Comments are closed.