‘मोनोपॉली’ देशाला वेठीस धरू शकते, इंडिगोचे उदाहरण देत राज ठाकरेंचे फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर

फोटो – चंद्रकांत पालकर पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. सिंमेट, स्टील, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, वीजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्यावेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो. आणि ज्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार असतं आणि केंद्राकडून पूर्णपणे रेड कार्पेट असतं, कुठेही जा आणि काहीही करा. माझा आक्षेप तिकडे आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी अदानींवरून मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला.

शिवतीर्थावर आमची जिथे सभा झाली तिथेच काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि बाकीच्या मंडळीची सभा झाली. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की, राज ठाकरे गौदम अदानीबद्दल जे बोललेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी टाटा, अंबानी आणि इतर सगळ्या उद्योगपतींचा विषय काढला. आणि त्या उद्योगपतींची ग्रोथ झालेली आहे, त्यांनी सांगितले. मुळात मी भाषणात आधीच सांगितलं होतं की, कुठल्या उद्योगपती, उद्योग समूह किंवा उद्योग येऊ नये याच्या विरोधातला हा विषय नाहीये. अंबानी, टाटा, बिर्ला, हिंदुजा किंवा अजून कोणी उद्योजक असतील. त्यांना इथपर्यंत पोहोचायला ५०, ६० ते १०० वर्षे लागली आहेत. पण यांच्याही पलिकडे एक माणूस आहे आणि तो फक्त १० वर्षांतच मोठा होतो, हा माझा विषय आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

सिमेंट, स्टील, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, वीजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्यावेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो. आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार ज्यावेळेला असतं. आणि केंद्राकडून पूर्णपणे रेड कार्पेट असतं, कुठेही जा आणि काहीही करा. माझा आक्षेप तिकडे आहे. उद्योगधंदे वाढले, उद्योगपती वाढले, उद्योग आल्यानंतर रोजगार निर्माण होतो. घरं उभी राहतात, तरुणांना नोकऱ्या निर्माण होतात, त्यांचे संसार उभे राहतात. त्यामुळे उद्योगाला विरोध आहे, असला मूर्खपणा माझ्या बोलण्यात नव्हताच आणि नाही, कधी येणारही नाही, असे राज ठाकरे यांनी सुनावले.

टाटा, बिर्ला, अंबानी असो किंवा आणखी कुठलाही उद्योगपती घ्या, यांनी यांचे उद्योग स्वतः उभे केलेले आहेत. आज विमानतळ बघितली तर सात का आठ विमानतळं गौतम अदानींना केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहेत. आणि त्यातलं फक्त नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ गौतम अदानींनी बांधलेलं नाही. ही दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली किंवा केंद्र सरकारच्या हातात असलेली ही सगळी विमानतळं आहेत. पोर्ट्स याच्यामध्ये मुंद्रा पोर्ट्स सोडलं तर जेवढी पोर्ट्स गौतम अदानींच्या हातात आता आहेत यातलं एकही पोर्ट हे गौतम अदानीने स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही. ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती त्यांना गनपॉइंटवर आणून त्यांच्याकडून ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

ज्या व्यवसायात गौतम अदानी कधीही नव्हते तो सिमेंटचा व्यवसाय यात अल्ट्राटेक, अंबुजा आणि इतर ज्या कंपन्या आहेत या विकत घेऊन हा माणूस आज या क्षणाला दोन नंबरला सिमेंट व्यावसायात आहे. बिर्ला एक नंबरला आहेत, नंबरला हा आहे. गेल्या १० वर्षांत एक माणूस सिमेंटच्या व्यवसायात दोन नंबरला जातो. दुसऱ्यांचे व्यावसाय खेचून, दुसऱ्यांचे व्यवसाय हातामध्ये घेऊन. वीजेही तसंच आहे, स्टीलचंही तसंच आहे, अनेक उद्योगांचं तसंच आहे. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की, हा विषय कोणाच्या ग्रोथचा नाहीये. ग्रोथ कशी होतेय? उद्योगपतीची वाढ कशी होतेय? तर ती वाढ समजून घेणं गरजेचं आहे. उद्या हा एकच माणूस या देशाला वेठीस धरू शकतो. याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर जे देशामध्ये इंडिगोने केलं. संपूर्ण अख्खा देश स्टँडस्टिलवर आणला आणि सगळी विमानतळं बंद झाली. ६५ टक्के हवाई वाहतूक ही एकट्या इंडिगोकडे देण्यात आली आणि एका एअरलाइनने व्यावसाय ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात? हे आपण पाहिलंय. मला असं वाटता हा धोका सर्वाधिक आहे. आणि तो धोका मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात समजलं असेल तरी ते सांगतील कोणाला? असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला.

हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानीला अर्थ सहाय्य कुठून झालं? कोण-कोणत्या बँकांना इतर वित्त संस्थांना यांना अर्थ सहाय्य करायला लावलं? उद्या जर अशा प्रकारे गोष्टी कोसळल्या तर नोकऱ्या जातील, देश बर्बाद होईल, एक दिवस हा देश ठप्प होईल. हा माझा सांगण्याचा उद्देश होता. आणि एक ते टुल वापरून महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला काबीज करायला तुम्ही जाता तो धोका महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे. त्यावर माझं भाष्य होतं, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.