महाराष्ट्रात आज माणसांचे लिलाव सुरू आहे, राजकारणातील स्थिती बघून बाळासाहेब व्यथित झाले असते – राज ठाकरे
महाराष्ट्रात आज माणसांचे लिलाव सुरू आहे, राजकारणातील स्थिती बघून बाळासाहेब व्यथित झाले असते, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारी, 2026 पासून सुरु झालं असून माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आजारी पडले होते. त्यानंतर मी ताणून धरलं होतं, मग मला सर्दी खोकला, ताप सुरू झाला अजून ते सुरूच आहे. मी काल त्यांना म्हटलं होतं, मला फार बोलता येणार नाही. कारण शब्दांवरील अनुस्वार सर्दीमुळे गेलेत. डॉक्टर यादव म्हणून माझे फॅमिली डॉक्टर आहेत, मराठी यादव. मी त्यांच्याकडून औषध घेऊन उद्धव ठाकरे यांना दिली. उद्धव ठाकरे दोन दिवसांत बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडून सहा दिवस झाले, अजून काही नाही. मी पर्वा उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि म्हणाले की, माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय..” ते असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
राज ठाकरे म्हणाले, “आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. आजच्या सामानात माझा लेख आला असून त्यात मी त्यांच्या अनेक आठवणींबद्दल लिहिलं आहे. खरं तर, त्या व्यक्तीला कसं पाहायचं किंवा मांडायचं, असे अनेक प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं, व्यंगचित्रकार बाळसाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं? त्याच्यावरती बोलायचं म्हंटल तर, मी आणि उद्धव ठाकरे तासंतास बोलू शकतो. मी मागे त्यांच्या तैलचित्राचे अनावरण यावेळी त्यांचे खूप किस्से आहेत, जे मला सांगता ही येणार नाही. न सांगण्याचं कारण म्हणजे भाषा. तुम्हाला माहित नाही, ते काय होते. तुम्हाला भाषणांमधून फक्त छोटे-छोटे अशा झलक मिळाल्या होत्या.”
ते म्हणाले, “आजच ती गोष्ट माझ्या लेखामध्ये नमूद केल्या आहेत की, लहानपणापासून अनेक गोष्टी पाहत आलो. म्हणजेच त्यांना पाहत आलो. बाहेर इतकं वादळ सुरू असायचं, कुठे दंगली, कुठे राडे, कुठे आंदोलन, जेल आणि कधी कोणावर काय संकट येईल. बाहेर सगळं वातावरण चालू असताना हा बाळासाहेब ज्यावेळी व्यंगचित्र काढायला बसायचे, त्या व्यंगचित्रात मला आजपर्यंत कधीही मारकाम दिसलं नाही. बाहेर इतका गोंधळ सुरू आहे, झटपट आटपा व्यंगचित्र काढा आणि प्रिंटिंगला द्या. कधीच नाही. कित्येकदा मी विचार करतो, मात्र अशक्य आहे ती गोष्ट. अनेकदा लोकांना वाटत असेल, अरे एवढं सगळं बाहेर सुरू आहे, हा माणूस व्यंगचित्र काय करतोय. ती नुसती व्यंगचित्र नव्हती. ती त्या माणसाची समाधी होती. समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना, त्या एकाग्रतेतून त्या सगळ्या गोष्टी करणं, कुठंही पेन्सिल, ब्रश आणि विनोद हलला नाही. बाहेर एवढं सगळं वातावरण चालू असताना, त्या व्यंगचित्रामधील विनोदही कधी हलला नाही. मागे मी एकदा बोललो होतो. विजय तेंडुलकर यांचं छान पुस्तक आहे की, हे सगळं येतं कुठून? बाळासाहेब ठाकरे म्हणून मी जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा अनेक गोष्टी डोळ्यासमोरून जातात. खरंच प्रश्न पडतो, हे येतं कुठून? आलं कुठून? आणि म्हणून ते देशातील राजकरणामधील सगळ्यात वेगळे व्यक्तिमत्व होतं, याचं कारण ते आहे. त्याच लेखात मी म्हटलं आहे की, एवढं सगळं बाहेर वातावरण, सगळ्या राजकीय गोष्ट घडत असताना, एक आर्टिस्ट, एक कलाकार त्याची कलाकृती सादर करतोय, काढतोय. त्याला आकार देतोय, जगात असा कोणताही चित्रकार, शिल्पकार, व्यंगचित्रकार झाला नाही की, बाहेर स्वतःच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडत आहे. एक माणूस कला निर्माण करतोय. असा कोणताही आर्टिस निर्माण झाला नाही. या जगात नसेल.”
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आजची राजकीय परिस्थिती पाहिली की, मी भाषणात म्हणालो होतो. बाळासाहेब असायला हवे होते. आज देशाची आणि महाराष्ट्राची जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार. महाराष्ट्रामधील हे सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही आहेत ते बरं आहे. ते किती व्यथित झाले असते, त्यांना काय त्रास झाला असता, हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रात उभं झालं आहे, जे समोर दिसतंय. दोन, एकशे वर्षांपूर्वी चावडीवर उभे राहून माणसांचे लिलाव चालायचे, आज तसं महाराष्ट्रात लिलाव चालू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हे सुरू आहे, ज्यात कल्याण-डोंबिवली असेल किंवा इतर कोणत्या ठिकाणी. माझं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी बोलणं झालं. शिसारी आली शिसारी. ज्याला व्यथित होणं म्हणतो, काय चाललं आहे, कुठे नेहतोय (महाराष्ट्र) आपण. आजही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब ठाकरे नाहीत, या सारखी चांगली गोष्ट नाही. ते आज हे सगळं बघायला नाहीत, ते पाहूच शकले नसते. ज्या गोष्टी शून्यातून उभ्या केल्या, आज तुम्ही बाहेरच्या पक्षात बघितलं तर, अनेक असे दिसतील जे बाळासाहेब यांनीच निर्माण केले होते. ज्या गोष्टी घडत जात आहेत, ज्या गोष्टी घडत गेल्या. मी ज्यावेळी बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या, माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टींना आज २० वर्षांचा काळ निघून गेला आहे. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, मला असं वाटतं, अनेक गोष्टी उद्धव ठाकरे यांनाही उमजल्या असतील. द्या सोडून त्या आता.”
Comments are closed.