गुन्हा कबूल नाही ! राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात हजेरी, दीड मिनिटात सुनावणी संपली

रेल्वे नोकरभरतीमध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना केलेल्या कथित मारहाणप्रकरणी आपणास गुन्हा कबूल नाही असे आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टपणे ठाण्याच्या न्यायालयात सांगितले. आज त्यांनी येथील कोर्टात हजर राहून आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, आम्हाला सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपवू कोर्टाने स्पष्ट केले, पण ठाकरे यांनी मारहाणीचा गुन्हाच मान्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे.
२००८ साली रेल्वे नोकरभरती साठी कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध राज्यांमधून उमेदवार आले होते. रेल्वे स्थानकात काही उत्तर भारतीय उमेदवारांना झालेल्या मारहाणीप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह ५४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी कल्याण कोर्टातही झाली. त्यावेळीदेखील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येथील न्यायालयात उपस्थित होते.
मोठा पोलीस बंदोबस्त
या प्रकरणाचा खटला आता ठाणे सत्र न्यायालयात सुरू आहे. आज राज ठाकरे हे स्वतः गुन्हा दाखल असलेल्या सात कार्यकर्त्यांसह न्यायालयात उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनीदेखील गर्दी केली होती. राज ठाकरे हे न्यायमूर्ती ए.व्ही. कुलकर्णी यांच्या कोर्टात आल्यानंतर न्यायमूर्तीनी आपणास गुन्हा मान्य आहे काय? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी हा गुन्हा मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. फक्त एक ते दीड मिनिटातच ही सुनावणी संपली आणि राज ठाकरे ठाणे कोर्टातून बाहेर पडले. गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्याने लवकरच या प्रकरणाची सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी होणार आहे.

Comments are closed.