जो पर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही. तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा; राज ठाकरे यांचे आव्हान
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप व निवडणूक आयोगाला जोरदार फटकारले. तसेच जो पर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही. तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा; असे आव्हान देखील राज ठाकरे यांनी यावेळी केले.
सध्या ज्या प्रकारचा गोंधळ सुरू आहे तो गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. 2016-17 ला मी व्होटिंग मशिन व मतदार याद्यांविरोधात विरोधात आवाज उठवला होता. आता सगळ्यांना कळून चुकलंय की निवडणूकीचे काय प्रकार सुरू आहे. आता विधानसभेत सत्ताधाऱ्यांचे 232 आमदार निवडून आले. एवढे प्रचंड आमदार निवडून येऊन देखील महाराष्ट्रात सन्नाटा होता. मतदार तर अवाक झाले होते तर निवडून आलेले देखील अवाक झाले होते. निवडून आलो तर कसा आलो. सगळ्यांनाच कळलंय की कशा प्रकारच्या निवडणूका चालल्या आहेत. अनेकजण बोलततात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण मतात रुपांतर होत नाही. असं केल तर कसं मिळणार मतं. तेच चालू आहे. राज्या राज्यातील स्थानिक पक्षांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा मतदार याद्या तयार करायच्या, माणसं घुसवायची. विधानसभेला होतेच त्यानंतर आताच्या या होणाऱ्या निवडणूकीत महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत. प्रत्येक शहरात गावा गावात खोटे मतदार भरलेले आहेत. आपल्या देशात अशा निवडणूका होणार असतील तर मग कशासाठी निवडणूका लढायच्या, कशाला मतदारांनी रांगेत उभं राहून मतदान करायचं. जर अशा प्रकारे निवडणूका होत असतील तर हा त्या मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मतं द्या नाहीतर नका देऊ मॅच फिक्सिंग झालेलं आहे… हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे. नंतर बोलतात की यांचा एकही आमदार, खासदार निवडून आला नाही. अरे येईल कसा? मतदार याद्यांमध्ये तुम्ही जर सर्व गणितं सेट करून ठेवणार असाल, लोकांनी मतदान करा नाहीतर नका करू रिझल्ट ठरलेला आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.
”आम्ही जर निवडणूक आयोगावर बोलतोय मग सत्ताधारी पक्षाचे लोकं का चिडतायत, कारण त्यांना लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केले की सत्ताधारी उत्तर देतात, त्यांना राग येतोय कारण त्यांनी शेण खाल्लंय. गल्लीतल्या पोरांना पण माहिती आहे की कशाप्रकारचे राजकारण सुरू आहे. ही लोकं जेव्हा विरोधी पक्षात होती तेव्हा आता जे मी बोलतोय तेच बोलत होते. निवडणूक आयोगाला आम्ही सांगतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात. महाराष्ट्रात यांची हिंमत कुठपर्यंत गेलीय तर सत्ताधारी पक्षाचा आमदारा जाहिररित्या भाषणात सांगतात की मी 20 हजार मतदार बाहेरून आणले. त्यानंतर शिंदेनी इशारा करताच त्यांनी मग वाक्य बदललं. सत्ताधारी पक्षातले आमदार बेधडक तुमच्या नाकावर टिच्चून बोलताय. महाराष्ट्रातल्या जनतेचा व्यासपीठावर बसून अपमान करतायत. निवडणूक आयोगाच्या यादीत घोळ आहे हे बोलणारे फक्त आम्ही नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार देखील बोलत आहेत. हे प्रश्न गेल्या पंधरा वर्षातच का पडले. जे लोकं भाबडेपणाने मतदान करतायत. त्यांच्या मताला काही किंमत नसेल व आकडेवारी जुळवून तुम्हाला निकाल मिळवायचा असेल तर कशासाठी निवडणूका घ्यायच्या आहेत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
सगळी शहरं अदानी अंबानींना आंदन द्यायचीयत
”केंद्रात, राज्यात, महानगरापालिकेत, जिल्हापरिषदेत आम्हीच पाहिजे आणि महाराष्ट्रातील सगळी शहरं अदानी अंबानी सारख्यांना आंदन म्हणून द्यायची आहेत. मागे मीरा भाईंदरच्या सभेत सांगितलेलं की हे सर्व का चालू आहे यांचं? यांना माहित आहे की ठाणे हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही. त्यामुळे तिथून सुरुवात केलीय. पालघरपासून सुरू आहे. मागे मी बुलेट ट्रेनला विरोध केला होता तो याच साठी. तो अख्खा भौगोलिक पट्टा बघा. आता तिथे वाळवण बंदर येतंय. वाढवणला एक विमानतळ करतायत. कोणासाठी? मला यांचा प्लॅन कळलाय. तो लक्षात ठेवा. आता जे नवीन विमानतळ केलंय सांताक्रूझचं जे विमानतळ आहे ते अडानीच्या हातात आहे. इकडून सगळी ऑपरेशन्स हळू हळू नवी मुंबईला नेणार. कार्गो सगळा वाढवणला नेणार. मग मुंबई विमानतळाची जेवढी जमिन आहे ती अडानीच्या घशात घालणार. जेवढं जेवढं म्हणून तुमचं अस्तित्व मिटवायला येतायत. भाजपला मतदान करणारे मराठी लोकं आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे. गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा तुम्हाला बघणार नाही. तुमच्यावरही वरवंटा फिरवणार. सगळ्या गोष्टींमध्ये अडानी, शस्त्र बनवायची अदानी, टनेल बनवायची अदानी, रस्ता बनवायचाय अदानी. ठाण्यातली एक जागा आहे. नॅशनल पार्कमधली एक जागा बघितली आहे. तिथलं जंगल तोडणार. तिथे अदानीला पॉवर प्रोजेक्ट करायचाय. मला यांना सांगायचं आहे की मुंबई महाराष्ट्रात होणारी प्रगती मराठी माणसाच्या थडग्यावर होणार असेल तर ती मी खपवून घेणार नाही”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
”हे जे उद्योगपती जमीन घेत सुटले आहेत. त्यांच्यासाठी हे अटल सेतू, सिलिंक बांधले जात आहेत. हे रस्ते सामान्यांसाठी नाही तर या उद्योगपतींसाठी बांधले जातायत. माझा विकासाला विरोध नाही. पण जिथे नजर पडेल ते मला पाहिजे अशी परिस्थिती आहे सध्या. आमचीच मराठी माणसं दलाल म्हणून काम करतायत. त्यांना जमीन मिळवू देतायत. केंद्र, राज्य यांच्या हातात आहे. आता महानगरपालिका जिल्हापरिषदा जर गेल्या तर यांना रानच मोकळं. हे सगळं सहज सुरू नाही. प्लॅन्ड आहे. गुजरातला मुंबई हवी होती. त्यासाठीच संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. मुंबई महाराष्ट्राला देऊ नका हे सांगणारे पहिले होते वल्लभभाई पटेल. तेव्हा पहिला विरोध यांनी केला होता. हे आताच नाही. जुनं आहे. आता फक्त सगळ्यांच्या सहाय्याने करत येतायत व बोगस मतदार भरत आहेत. एकदा का सगळं हातात आलं की मग तुम्ही काय करणार आहात. एकदा जमिन हातातून गेली की तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना आवाहन आहे की सतर्क रहा. एक एका घरात आठशे, पाचशे माणसं भरली जात आहेत. अशी खोटी नावं भरून हे निवडणूकांना सामोरं जायला बघतायत. त्यामुळे जो पर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही. तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा. महाराष्ट्रातील निवडणुका शांततेत पार पाडायच्या असतील तर आधी मतदार याद्या स्वच्छ करा, असे आव्हान राज ठाकरे यांनी केले आहे.
Comments are closed.