बघून घेईन ही काय भाषा… मुख्यमंत्री आहेस ना तू! राज ठाकरे बरसले
मिसिंग लिंकवरून कुणी राजकारण करत असेल तर आम्ही बघून घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना? ही काय भाषा? मराठीत बोलले. त्यानंतर लगेच हिंदीत सुरू झाले. समोरचे आमदार मराठी, विधानसभा महाराष्ट्राची आणि आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. हे कशासाठी आणि कोणासाठी होतं? कदाचित फडणवीस यांना आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल तुम्हाला बघून घेईन, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेतील भाषणात मिसिंग लिंकवरून राजकारण करू नका असे सांगितले. वा रे वा, त्याचं राजकारण करू नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण, आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय करत होतात? दुसऱयांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात असे तुम्ही बोलताय, पण या सगळय़ा गोष्टी आपणच सुरू केल्या होत्या, असे राज ठाकरे यांनी सुनावले.
बॉम्ब टाकीन म्हणायची खासदाराची हिंमत कशी होते?
एक खासदार सांगतो, मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावर पाच मर्डर आहेत. हे सगळं आपल्या राज्यात होते. त्याला कुणाचा हात लागत नाही. कारण तो सत्तेत गेला आहे. हे बोलायची हिंमत कशी होते? कारण कुणाचा अंकुशच नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी गद्दार खासदार संजय दिना पाटील यांचा समाचार घेतला.
राम मंदिराच्या चोरीबाबत बोललो तर धर्माचा अपमान कसा?
मी राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध? हे म्हणतात की वक्फ बोर्डामध्ये जेव्हा चोऱया झाल्या तेव्हा तुम्ही का नाही बोललात? पण आम्हाला त्याच्याशी काय घेणं-देणं? आमचा प्रश्न राम मंदिरातील चोऱयांबद्दल आहे. तिथे 15 ट्रस्टी आहेत. त्यापैकी 12 ट्रस्टी हे आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित आहेत. बाकी तिथे कोणीच नाही. जर आज दुसऱया कोणाचं सरकार असतं आणि अशी चोरी झाली असती तर याच लोकांनी मोर्चे काढून रान पेटवले असते, अस राज ठाकरे म्हणाले.
हा महाराष्ट्राचा अपमान कसा?
मिसिंग लिंकच्या ठिकाणी खांब कोसळला, पाणी गळत आहे आणि यावर लोक बोलले की फडणवीस म्हणतात ‘माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. मिसिंग लिंकच्या कामाबाबत बोललो, लोकांनी प्रश्न विचारले तर तो महाराष्ट्राचा अपमान कसा?’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
Comments are closed.