निवडणुका लढवणाऱ्या राजकीय पक्षांनाच मतदार याद्या दाखवत नसतील तर हाच पहिला घोळ, राज ठाकरे यांनी आयोगाला धरलं धारेवर
मतदार याद्यांमधील घोळ आणि लपवाछपवीविरुद्ध सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम व राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सर्वपक्षीयांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. तसेच मतदार याद्यांमध्ये कशाप्रकारे घोळ आहेत ते उदाहरणासहित दाखवून दिले.
”काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना व आज केंद्र व राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. आज मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवायची आहे. निवडणूक म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले, निवडणूकांना मतदान करणारा महाराष्ट्रातील मतदार आला. निवडणूक आयोग हे फक्त निवडणूका घेतात परंतू राजकीय पक्ष निवडणूका लढवतात. जर निवडणूका लढवणाऱ्या राजकीय पक्षांनाच मतदार याद्या दाखवत नसतील तर हाच पहिला घोळ आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
”2024 च्या निवडणूका व्हायच्या आधीच्या आणि निवडणूका झाल्यानंतर अशा दोन याद्या माझ्याकडे आहेत. 2024 च्या निवडणूका झाल्या त्यावेळच्या मतदार यादीचा छोटासा तपशील वाचून दाखवणार आहेत. 2024 च्या आधीची जी यादी आहे त्यावरून यादीतला घोळ महाराष्ट्राला समजेल”, असे सांगत राज ठाकरे यांनी दोन उदाहरणं दिली.
१ मतदार संघ क्रमांक 160 कांदिवली पूर्व, मतदाराचे नाव धनश्री कदम, त्यांच्या वडिलांचे नाव दीपक कदम, मतदाराचे वय 23.
– वडिलांचे नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांच्या वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय 117
२ मतदार संघ १६१ चारकोप, नाव नंदिनी चव्हाण, वडिलांचे नाव – रविंद्र चव्हाण, वय – 124 ;
– वडिलांचे नाव – रविंद्र श्रीनाथ चव्हाण, वडिलांच्या वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण – वय 43
”हा 2024 च्या निवडणूकी नंतरचा घोळ आहे. 202४ नंतर त्यांनी वेबसाईटवर यादी जाहीर केली त्यात फक्त नावं आहेत. फोटो, पत्ता नाही. काल जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला भेटलो तेव्हा केंद्र व राज्य आयोग हे एकमेकांवर ढकलत होते. राज्यातील राजकीय पक्षांना या संपूर्ण याद्या न दाखवण्यातून काय मिळणार आहे. यातून फक्त घोळ होणार आहेत. या मतदार याद्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका. गेल्या पाच वर्षात निवडणूका झालेल्या नाहीत. पाच वर्ष जर गेली असतील तर आणखी सहा महिने गेले तर काय फरक पडेल. याद्या सुधारल्याशिवाय निवडणूका घेऊ नका”, असे राज ठाकरे म्हणाले.
Comments are closed.