राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका, राज ठाकरे यांचा इशारा
मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यत्रक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच गेल्या काही दिवसात जैन समाजाकडून रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर आले होते. या दोन्ही घटनांबाबात बोलताना राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला समज दिली. तसंच ”सत्तेत दोन गुजराती बसलेयत म्हणजे आम्ही वाटेल ते करू असं होत नाही. राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका”, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
”राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका. तुमचा वापर केला जातोय. तुमची डोकी भडकवली जातायत. तुमच्या सोसायटीत जर गुरू येणार असतील तर कार्पेट टाका, पांढरं कापड टाका आणि भेट संपल्यानंतर ते काढून टाका. सरसकट पांढरे पट्टे मारणार. काय सांगायचं आहे तुम्हाला पांढरे पट्टे मारून. ट्राफिक डिपार्टमेंटला आहात का? विनाकारण वाद निर्माण करताय. इतकी वर्ष आम्ही इथे राहतोय. कधी वाद नाही झाला. हे आताच कसं सुरू झालं गेल्या दहा बारा वर्षात. वर दोन गुजराती बसलेयत म्हणजे आम्ही वाटेल ते करू असं होत नाही. व्यापारी लोकं आहात व्यापार करा. धर्माचे काम करा. धर्माचे कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेले नाही. जैन मुनी पद्मसागर हे माझ्या घरीही येऊन गेले आहेत. तुमच्या समाजातल्या लोकांना तुम्ही समजावून सांगा”, असे राज ठाकरे म्हणाले.
Comments are closed.