Rajan Salvi expresses his feelings after joining Shiv Sena


ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन साळवी यांनी वाट चुकलेला माणूस पुन्हा कुटुंबात आला असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज (13 फेब्रुवारी) त्यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन साळवी यांनी वाट चुकलेला माणूस पुन्हा कुटुंबात आला असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. (Rajan Salvi expresses his feelings after joining Shiv Sena)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाई असा उल्लेख करत राजन साळवी म्हणाले की, 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. छोटा भाऊ मागे राहिला होता. तो कुटुंबासोबत येऊ इच्छितो, आम्हाला तुमच्यासोबत घ्या, असे मी भाईंना सांगितले. त्यांनी आमची इच्छा मान्य केली. त्यामुळे आज हा सुवर्ण दिवस आला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. इथेच एकनाथ शिंदे नेतृत्व घडले, असे साळवी म्हणाले.

हेही वाचा – Rajan Salvi : गंभीर आरोप करत ठाकरेंची साथ सोडली, राजन साळवींनी सांगितले खरे कारण

राजन साळवी म्हणाले की, 2000 साली मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झालो. त्यावेळी गुरुवर्य दिघेंनी मला सन्मानित केले होते. आज याच भूमीत तुम्ही मला सन्मानित केले. त्यामुळे माझ्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत, तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आहेत. कारण ज्या पक्षाने मला नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनेते, आमदार केले, तो पक्ष मला आज सोडावा लागला. त्यामुळे मला दु:ख होत आहे. पण वाट चुकलेला माणूस पुन्हा कुटुंबात आला, याचा आनंदही मला होत आहे. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत जावू शकलो नाही, अशी मनात खंतही आहे. कारण त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. अशा भावना राजन साळवी यांनी यावेळी बोलून दाखवल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात आता शतप्रतिशत शिवसेना करणार

राजन साळवी म्हणाले की, विधानसभा 2024 निवडणुकीत झालेला पराभव मी मान्य केला आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात आता शतप्रतिशत शिवसेना करणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यावर बातम्या सुरू झाल्या की, राजन साळवी यांना विधान परिषद देणार किंवा मोठी जबाबदारी देणार. परंतु मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळाले आहे. त्यामुळे मला आता काहीच नको. मला फक्त माझ्यासोबत राजापूर मतदार संघातून आलेल्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचा योग्य सन्मान व्हावा, हीच अपेक्षा आहे. तसेच उदय सामंत पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मला छोटा भाऊ म्हणून समावून घ्यावे, असेही राजन साळवी यावेळी म्हणाले.

हेही वाचा – Vaibhav Naik : राजन साळवींनंतर वैभव नाईक यांच्याकडूनही भूमिका स्पष्ट, ठाकरेंसोबत राहणार? 



Source link

Comments are closed.