Rajan Salvi resigned from post of deputy leader of the Thackeray group


माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा ठाम निर्णय घेतला असून त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते गुरुवारी (ता. 13 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील.

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी हे पक्षाला रामराम करणार असल्याची माहिती समोर येत होती. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती आणि याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. आज बुधवारी (ता. 12 फेब्रुवारी) राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. साळवींनी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते गुरुवारी (ता. 13 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. (Rajan Salvi resigned from post of deputy leader of the Thackeray group)

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोकणात आणखी एक धक्का बसला आहे. कारण पक्षाचे उपनेते, माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटातील पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबतची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु, आता अखेरीस त्यांनी राजीनामा दिला असून ते गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. त्यामुळे त्यांनी अंतर्गत राजकारणाला वैतागून पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

हेही वाचा… मराठी : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून एकनाथ शिंदे चिडले; म्हणाले, ‘चारीमुंड्या चित केलेय, तरीही…’

कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते. यावरून ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस सुरू होती. याचा निवाडा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते. पण तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंनी साळवी यांनाच सुनावले होते. तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर दरवाजे उघडे आहेत, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे राजन साळवी प्रचंड दुखावले गेले होते. हीच संधी साधून भाजपा आणि शिंदे गटाकडून राजन साळवी यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु, ठाकरेंची साथ सोडायची की नाही, याबाबत राजन साळवी द्विधा मनस्थितीत होते.

इतकेच काय तर मविआ सरकारची सत्ता गेल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेटाने उभे राहिले होते. पण आता तर थेट ठाकरेंनीच त्यांची कानउघडणी केल्याने राजन साळवी यांनी आणखी फार काळ पक्षात न थांबण्याचा निर्णय घेत शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर चालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तर एकनाथ शिंदे यांनीही पक्षात त्यांचे स्वागतच आहे, असे म्हटले असून यामुळे कोकणात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.



Source link

Comments are closed.