विजेच्या लोंबकळणाऱ्या तारेचा स्पर्श; राजापूर तालुक्यातील आजिवली येथे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गरीब शेतकऱ्याचा महावितरणच्या जमिनीवर लोंबकळणाऱ्या जिवंत विद्युत तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यातील आजिवली गावात घडली. जयवंत राणे (वय ४९, रा. आजिवली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत राणे शनिवारी सायंकाळी गावातील शिवारात गुरे चारत असताना गवतात पडलेल्या विजेच्या तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती देऊनही महावितरणचे अधिकारी रात्री पावणेदहा वाजेपर्यंत घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. जयवंत हे कुटुंबातील एकमेव कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. महावितरण किंवा शासनाकडून तातडीने ठोस आर्थिक मदत जाहीर होत नाही, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवू देणार नाही असा पवित्रा घेत नातेवाईक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर यांनी भेट दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हा बळी गेल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला असून राजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.