तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

राजापूर तालुक्यातील भालावली गावात 18 जानेवारी 2023 मध्ये घडलेल्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी विनायक गुरव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन महाविद्यालयीन युवतींवर लाकडी दांडय़ाने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात साक्षी गुरव या युवतीचा मृत्यू झाला होता, तर दुसरी गंभीर जखमी झाली होती.

गावात सुतक-सुवेर पाळणे आणि गावदेवतेच्या दास्तानाच्या हक्कावरून दोन गटांत तीव्र वाद निर्माण झाला होता. या धार्मिक वादातूनच या प्रकरणाला हिंसक वळण लागले, असे तपासात स्पष्ट झाले. गावातील नवदुर्गा मंदिराचे दास्तान मयूर गुरव यांच्या कुटुंबाकडे होते. मात्र विरोधी गटाला हे मान्य नव्हते. या प्रकरणी तक्रार यापूर्वी पोलिसांत नोंदवण्यात आली होती. दरम्यान, जुन्या वादातून घरकुल बांधकामावरूनही तणाव वाढला होता. न्यायालयीन स्थगितीमुळे आरोपी विनायक गुरव याच्या मनात मयूर गुरव यांच्या कुटुंबाविरोधात तीव्र राग होता. याच रागातून हा क्रूर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले. जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण 14 साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

असा झाला हल्ला

घटनेच्या दिवशी मयूर गुरव यांची बहीण साक्षी गुरव आणि शेजारील मुलगी सिद्धी संजय गुरव या दोघी महाविद्यालयातून पायी घरी परतत असताना विनायक गुरव याने रस्त्यात अडवून संतोष गुरव यांच्या आंबा बागेजवळ लाकडी दांडय़ाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. “तुमचे खानदान संपवून टाकीन,’’ अशी धमकी देत त्याने दोघींच्या डोके व मानेवर जोरदार वार केले. या हल्ल्यात दोन्ही युवती गंभीर जखमी झाल्या होत्या.

Comments are closed.