40 व्हिला आणि वार्षिक 1.8 कोटींचे भाडे… राजस्थानमधील IAS-IPS दाम्पत्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू
राजस्थानमधील एका वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्याने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दोन-अडीच वर्षांत ‘अनंता’ रिसॉर्ट्समध्ये तब्बल ४० व्हिला आणि कॉटेज अवघ्या ६.१६ कोटी रुपयांत खरेदी करून ते पुन्हा संबंधित कंपनीलाच वार्षिक १.८ कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पदाचा गैरवापर करून कंपनीला अनुचित लाभ मिळवून देणे आणि बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपांखाली राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सखोल चौकशी सुरू केली आहे.
उद्योग विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव शिखर अग्रवाल यांच्याविरुद्ध ही कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यांना आधीच ‘प्रतिक्षाधीन’ (Awaiting Posting Orders – APO) ठेवण्यात आले आहे. यानंतर राजस्थान सरकारने त्यांच्या पत्नी आणि वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी प्रशाखा माथूर यांनाही एपीओ (APO) केले आहे. ‘अनंता’ ब्रँड अंतर्गत रिसॉर्ट्स चालवणाऱ्या ‘गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला अनुचित लाभ पोहोचवल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मंजुरी दिली आहे.
कंपनीला नियमबाह्य सवलती दिल्याचा संशय
३० ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात एसीबीने स्पष्ट केले की, प्राथमिक चौकशीत शिखर अग्रवाल यांनी गोयल फॅशन्सच्या संचालकांशी संगनमत करून कंपनीला अवाजवी फायदा मिळवून दिल्याचे आणि सरकारचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळले आहेत.
अग्रवाल यांनी उदयपूरचे जिल्हाधिकारी, राजस्थान राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलेल्या कार्यकाळाशी हे आरोप संबंधित आहेत. एसीबीच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंपनीला रिसॉर्टच्या बांधकामातील नियमांत सवलती, अनिवार्य प्रमाणपत्रांची योग्य तपासणी न करताच मंजुऱ्या आणि अनुकूल अटींवर विशेष आर्थिक पॅकेजेस देण्यात आली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ए (Section 17A) अंतर्गत तपास केला जात आहे.
अडीच वर्षांत ४० मालमत्तांची खरेदी
तपास यंत्रणेनुसार, हे सर्व व्यवहार राजस्थानमधील दोन वेगवेगळ्या अनंता रिसॉर्ट्समध्ये झाले आहेत:
सप्टेंबर २०२३: उदयपूरमधील बुझडा येथील रिसॉर्टमध्ये कुटुंबाने २० कॉटेज खरेदी केले.
मार्च २०२६: अलवरमधील अजबगड येथील रिसॉर्टमध्ये आणखी २० व्हिला खरेदी करण्यात आले.
या सर्व ४० मालमत्ता गोयल फॅशन्सकडून एकूण ६.१६ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्या. एसीबीच्या प्राथमिक अंदाजानुसार, या मालमत्तांचे दर तत्कालीन बाजारभावापेक्षा खूपच कमी दाखवण्यात आले आहेत.
उदयपूरच्या रिसॉर्टमध्ये अग्रवाल आणि माथूर या दोघांनी प्रत्येकी १० व्हिला प्रति व्हिला १५ लाख रुपयांना खरेदी केले. अलवर येथील रिसॉर्टमध्ये दोघांच्या नावावर प्रत्येकी १६.५ लाख रुपये दराने आठ व्हिला नोंदवण्यात आले. याशिवाय, त्यांच्या दोन मुलांच्या नावावर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे चार-चार व्हिला आणि माथूर यांच्या पालकांच्या नावावर प्रत्येकी १६.५ लाख रुपयांचे चार व्हिला खरेदी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Comments are closed.