IPL 2026 पूर्वी रवींद्र जडेजाचे वादळ! 250 हून अधिक स्ट्राइक रेटने अवघ्या 34 चेंडूत ठोकल्या ‘इतक्या’ धावा

आयपीएलच्या नवीन हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan royals) संघ जोरदार तयारीत व्यस्त आहे. गेल्या वेळच्या तुलनेत या हंगामात हा संघ अधिक मजबूत दिसत आहे. मिनी लिलावापूर्वी संघाने चेन्नई सुपर किंग्ससोबत ‘ट्रेड डील’ करून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja and Sam curren) आणि सॅम करन सारख्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. या स्पर्धेत राजस्थानचे भवितव्य बऱ्याच अंशी जडेजाच्या फॉर्मवर अवलंबून असेल आणि स्पर्धेपूर्वीच जडेजाने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांना खूश केले आहे.
राजस्थान रॉयल्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सराव सामन्यात धमाकेदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. ‘जुरेल 11’ विरुद्ध खेळताना त्याने अवघ्या 34 चेंडूत 95 धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीत त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत सर्व गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही त्याने आपली चमक दाखवली असून या सामन्यात 4 बळी देखील टिपले आहेत. जडेजाचा हा घातक फॉर्म पाहून राजस्थानचे चाहते नक्कीच सुखावले असतील. जडेजाने आपल्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 3260 धावा केल्या असून 170 बळी देखील घेतले आहेत.
राजस्थान रॉयल्सचा संघ 30 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली यावेळेस संघाची फलंदाजी खूपच मजबूत दिसत आहे. संघात यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांसारखे स्फोटक फलंदाज आहेत. विशेष म्हणजे, या हंगामात संजू सॅमसन राजस्थानकडून खेळताना दिसणार नाही; तो यावेळेस चेन्नईच्या पिवळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे.
Comments are closed.