CSK vs RR: वैभव सूर्यवंशीचं अवघ्या 15 चेंडूंत तुफानी अर्धशतक; राजस्थान रॉयल्सचा चेन्नईवर 8 विकेट्सने दणदणीत विजय
नुकताच आपला 15 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) या युवा खेळाडूने आयपीएल 2026 ची सुरुवात धमाकेदार पद्धतीने केली आहे. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजांना ‘बिहारच्या या लाल’ने एकट्याने जेरीस आणले. अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक ठोकून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या डावखुऱ्या फलंदाजाने 17 चेंडूंत 52 धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये 5 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 128 धावांचे लक्ष्य सहज पूर्ण करत चेन्नईचा 8 गडी राखून पराभव केला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण संघ अवघ्या 127 धावांत गारद झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad & Sanju Samson) आणि संजू सॅमसन यांची बॅट पूर्णपणे शांत राहिली.
याउलट, राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते. दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. 52 धावा करून तो बाद झाला खरा, पण तोपर्यंत राजस्थानने विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (38 धावा) आणि कर्णधार रियान पराग (14 धावा) यांनी नाबाद राहत 13 व्या षटकातच विजय मिळवून दिला.
चेन्नईचा संघ एका वेळी 74 धावांवर 7 बाद अशा अडचणीत सापडला होता. मात्र, इंग्लंडच्या जेमी ओव्हरटनने 36 चेंडूंत 43 धावांची खेळी करून संघाची लाज राखली आणि धावसंख्या 100 च्या पार नेली. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
Comments are closed.