ड्रिंक्स ब्रेकदरम्यान 'बॉटल कांड'! आरसीबीचा कॅप्टन रजत-दिनेश कार्तिक यांनी पंचांनाच सुनावले

आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (५ एप्रिल) महामुकाबला खेळला गेला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात सामना खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या या सामन्यात चौकार-षटकारांची बरसात झाली. अशातच ड्रिंक्स ब्रेकदरम्यान एक घटना घडली, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पड्डीकल ड्रिंक्स ब्रेकवेळी पाण्याच्या बॉटल शोधल असताना त्यांच्या लक्षात आले की मैदानावरील पंच त्यांच्यासाठी आणलेल्या बॉटलमधून पाणी पीत आहेत. यामुळे पाटीदार, तसेच आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक ऍंडी फ्लॉवर आणि फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक चांगलेच संतापले. त्यानंतर तिघांनी लगेचच पंचांना त्याचा जाब विचारला. तेव्हा पंचांनी स्पष्टीकरण दिले आणि त्यांना बाटली देणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवले. हे प्रकरण तेथेच संपले, मात्र चाहत्यांमध्ये त्याची चर्चा सुरूच आहे.

या सामन्यात आरसीबीने टिम डेव्हिडच्या स्फोटक खेळीच्या जोरावर २० षटकात ३ विकेट्स गमावत २५० धावसंख्या उभारली. डेव्हिडने २५ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. यामध्ये पड्डीकलने ५० धावा केल्या, तसेच पाटीदार ४८ धावा करत नाबाद राहिला. प्रत्युत्तरात सीएसकेची सुरूवात निराशाजनक झाली. त्यांचे पहिले तिन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले.

सरफराज खानने २५ चेंडूत ५० धावा करत काहीशी झुंज दिली, मात्र त्याला इतरांकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे सीएसके १९.४ षटकात सर्व विकेट्स गमावत २०७ धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला.

या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. त्यामध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्याने आयपीएलच्या इतिहासात २०० विकेट्स टप्पा गाठला. त्याने सीएसकेविरुद्ध ४ षटकात ४१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

या विजयाबरोबरच आरसीबी गुणतालिकेत अव्वलस्थानी आली असून त्यांंचा हा सीएसकेविरुद्ध सलग चौथा विजय ठरला आहे. तसेच आयपीएल २०२६ च्या हंगामातील सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव.

Comments are closed.