मुंबईविरुद्ध रजतची स्फोटक खेळी, ऍडम गिलक्रिस्टच्या 17 वर्ष जुन्या रेकॉर्डची पाटीदारने केली बरोबरी
आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१२ एप्रिल) संध्याकाळचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने धमाकेदार खेळी करत आयपीएलमधील १७ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
पाटीदारने मुंबईविरुद्ध अवघ्या २० चेंडूत ५३ धावा केल्या. यावेळी त्याने १७ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात कर्णधाराने सर्वात जलद अर्धशतक करण्याचा २००९ मध्ये ऍडम गिलक्रिस्टने रचलेला विक्रम मोडला. त्याने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना दिल्लीविरुद्ध ही कामगिरी केली होती. आता १७ वर्षांनंतर पाटीदारने त्याची बरोबरी करत अव्वल स्थान गाठले आहे.
मधल्या ओव्हर्समध्ये फलंदाजीला आलेल्या पाटीदारने येताच मोठे शॉट्स खेळत चेंडू सीमारेषेपार पाठवले. त्याने मंयक मार्कंडेच्या गोलंदाजीवर तीन लागोपाठ षटकार मारले. त्याने शार्दुल ठाकुरविरुद्धही त्याची दमदार फलंदाजी सुरू ठेवली. त्याने ९ चेंडूतच ३४ धावांचा टप्पा गाठला. चार चौकार आणि पाच षटकारांसह त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि गिलक्रिस्टच्या या उत्कृष्ठ विक्रमाची बरोबरी केली. तो मिचेल सॅंटनरच्या १६ व्या षटकाच्या त्या शेवटच्या चेंडूवर तिलक वर्माला झेल देत बाद झाला.
आयपीएलच्या इतिहासात कर्णधाराने केलेली सर्वात जलद अर्धशतके-
१७ चेंडू – ऍडम गिलक्रिस्ट विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स, २००९
१७ चेंडू – रजत पाटीदार विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२६
१८ चेंडू फाफ डू प्लेसिस विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२४
पाटीदारने या झटपट खेळीने आणखी एका विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने बंगळुरूसाठी आतापर्यंतच्या सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या क्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली. गेलने २०१३ मध्ये १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. या यादीत रोमारियो शेफर्ड पहिल्या स्थानी आहे. त्याने २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १४ चेंडूतच अर्धशतक केले होते.
पाटीदारच्या आधी फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. यामुळे बंगळुरूने २० षटकात ४ विकेट्स गमावत २४० धावा केल्या. ज्यामध्ये टीम डेविडच्या नाबाद ३४ धावा (१६ चेंडू) आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून शेरफेन रदरफोर्डने सर्वाधिक धावा केल्या. तो ३१ चेंडूत ७१ धावा करत नाबाद राहिला. हा सामना मुंबईने १८ धावांंनी गमावला.
Comments are closed.