लढाऊ जेट डीलमधील राजीव गांधी हे मध्यस्थ होते

भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 1970 च्या दशकात प्रस्तावित लढाऊ विमान व्यवहारात राजीव गांधी यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. साब-स्कॅनिया कंपनी भारताला विगेन लढाऊ विमान विकू इच्छिते, ज्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी मध्यस्थ आहेत, असे स्वीडिश मुत्सद्द्याने अमेरिकेच्या प्रशासनाला कळविले होते  असा दावा दुबे यांनी केला आहे. याकरता त्यांनी 2013 च्या विकीलीक्स अहवालाचा दाखला दिला आहे. तसेच इंदिरा गांधी यांनी संरक्षण व्यवहारांमध्ये अत्याधिक हस्तक्षेप केला होता, असा आरोप भाजप खासदाराने केला आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकार सत्तेवर असताना 2013 मध्ये यासंबंधी खुलासा झाला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह सरकारने या आरोपांप्रकरणी अमेरिका तसेच स्वीडनच्या सरकारच्या विरोधात का कारवाई केली नाही असा प्रश्न दुबे यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रीय हितांशी तडजोड

काँग्रेस आणि गांधी परिवारावर भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय हितांशी तडजोड करण्याचा आरोप दुबे यांनी वारंवार केला आहे. गांधी परिवाराने भारताला सोव्हियत संघालाच ‘विकले’ होते असा आरोप दुबे यांनी यापूर्वी केला होता. काँग्रेस नेते एचकेएल भगत यांच्या नेतृत्वात 150 हून अधिक काँग्रेस खासदारांना सोव्हियत महासंघाने वित्तीय मदत केली होती असा दावा सीआयए दस्तऐवजांचा दाखला देत दुबे यांनी केला होता.

Comments are closed.