राजनाथ सिंग यांच्या मार्लासशी चर्चा
भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्तरित्या संरक्षण सामग्रीची निर्मिती करणार
वृत्तसंस्था/कॅनबेरा
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लस यांनी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे चर्चा केली आहे. दोन्ही देशांनी संयुक्तरित्या संरक्षणसामग्रीचे उत्पादन करण्यासंबंधात ही चर्चा झाली. दोन्ही देशांनी संरक्षणक्षेत्रात दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णयही घोषित केला आहे. राजनाथ सिंह यांचा दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. मार्लस यांच्याशी माझी चर्चा अत्यंत सकारात्मक आणि सफल झाली आहे. आम्ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षणसंबंधांचा व्यापक आढावा घेतला आहे. संरक्षण साधनांचे उत्पादन, सायबर संरक्षण, सागरी सुरक्षा आणि स्थानिक आव्हाने या सर्व महत्त्वाच्या संरक्षण विषयक मुद्द्यांवर आमची बोलणी झाली आहेत. दोन्ही देशांनी त्यांची धोरणात्मक भागीदारी अधिक उंचीवर नेण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती चर्चेनंतर राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
भारत-प्रशांतीय क्षेत्रावरही चर्चा
भारत-प्रशांतीय क्षेत्र हे सध्याच्या काळात एक मोठे व्यापारी क्षेत्र म्हणून विकसीत होत आहे. हे क्षेत्र कोणत्याही एका देशाच्या वर्चस्वाखाली राहू नये. तसेच या क्षेत्रातून व्यापार आणि वाहतूक मुक्तपणे व्हावी, यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे एकमत आहे. त्या दृष्टीने दोन्ही देशांनी एकमेकांशी संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण संबंध अधिक दृढ होतील, असा मला विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी चर्चेनंतर व्यक्त केली.
संरक्षण उद्योगाचा विकास
दोन्ही देशांनी एकमेकांच्या सहकार्याने संरक्षण उद्योग क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संरक्षण उत्पादन उद्योगाला ऑस्ट्रेलियाचे सहकार्य मिळणार आहे. दोन्ही देश भविष्यकाळात संरक्षण साधने आणि शस्त्रास्त्रे यांचे एकत्रितरित्या उत्पादन करु शकतात. भारताने संरक्षण तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. भारताच्या संरक्षण उद्योगाची गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत मोठी आणि वेगाने वाढ झाली असून आज आम्ही जागतिक गुणवत्तेची आणि उच्च प्रतीची संरक्षण साधने निर्माण करण्याची विश्वासार्ह क्षमता प्राप्त केली आहे. ही महत्त्वपूर्ण बाब मी ऑस्टेलियाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे भविष्य काळात दोन्ही देश सामरिक आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करणार आहेत, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी रिचर्ड मार्लस यांच्याशी चर्चेनंतर केले.
Comments are closed.