16 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे

10 राज्यांमधील 37 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम घोषित

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. 10 राज्यांमधील 37 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. या जागा येत्या एप्रिलमध्ये रिक्त होणार आहेत. या जागांसाठी मतदान येत्या 16 मार्च रोजी होणार असून मतदानाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे. मतदानाच्या दिवशीच संध्याकाळी पाच वाजता मतगणनाही होणार असून त्याच दिवशी निर्णय घोषित केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या निवडणुकांची अधिसूचना 26 फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. तर 5 मार्च हा अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस असेल. 6 मार्चला अर्जांचे परीक्षण होणार असून 9 मार्च हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक आहे. महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहार या 10 राज्यांमध्ये 37 जागांसाठी त्या होत आहेत.

कोणत्या राज्यांमध्ये किती जागा…

महाराष्ट्रात 7, तामिळनाडूत 6, छत्तीसगड 2, पश्चिम बंगाल 5, आसाम 3, हरियाणा 2, हिमाचल प्रदेश 1, बिहार 5 तेलंगणा 2 आणि ओडिशा 4 अशा जागांसाठी ही द्वैवार्षिक निवडणूक होत आहे. अनेक महत्वाच्या आणि दिग्गज नेत्यांचा राज्यसभेचा कालावधी एप्रिलमध्ये समाप्त होणार आहे. या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा समावेश आहे. तसेच प्रियांका चतुर्वेदी, तिरुची शिवा, साकेत गोखले, रामदास आठवले, अभिषेक मनु सिंघवी, भागवत कराड, ममता मोहंता, रामेश्वर तेली, इंदू बाला गोस्वामी आणि उपेंद्र कुशवाह यांचाही कार्यकाळ पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेची संधी मिळते का, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. कारण महाराष्ट्रात सर्व विरोधी पक्षांकडे मिळून एक जागा मिळण्याइतके संख्याबळ आहे.

कोणाला पुन्हा संधी मिळणार…

कार्यकाळ संपणार असलेल्यांपैकी किती जणांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी  मिळणार हा देखील औत्सुक्याचा विषय आहे. निवडणुका होणाऱ्या 10 राज्यांपैकी महाराष्ट्र आणि हरियाणात 2024 मध्ये तर बिहारमध्ये 2025 मध्ये विधानसभा निवडणूक झालेली असून तेथे विरोधकांच्या जागा कमी झालेल्या आहेत. त्यामुळे या राज्यांमधून त्यांचे पूर्वीपेक्षा कमी सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे. 37 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला किमान 20 जागा मिळू शकतात, अशी परिस्थिती आहे. या निवडणुकांच्या नंतर राज्यसभेत सत्ताधारी आघाडीच्या जागांमध्ये वाढ होणार असून विरोधकांचे संख्याबळ आणखी कमी होणार आहे.

राज्यसभा निवडणुकांचा कार्यक्रम

एकंदर राज्ये 10

एकंदर जागा 37

निवडणुकांची अधिसूचना    26 फेब्रुवारी 2026

अर्ज सादरीकरण मुदत         5 मार्च 2026

अर्जांचे परीक्षण               6 मार्च 2026

अर्ज मागे घेण्याची मुदत      9 मार्च 2026

मतदानाचा दिवस                    16 मार्च 2026

मतदानाचा कालावधी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत

16 मार्च 2026 रोजी मतमोजणी/माघार घेणे

Comments are closed.