रालोआ चांगला आहे… विरोधक भित्रा आहे
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जागांच्या द्विशतकासह अतिप्रचंड विजय
वृत्तसंस्था/ पाटणा, नवी दिल्ली
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अतिप्रचंड विजय प्राप्त केला आहे. या आघाडीला विधानसभेच्या 243 जागांपैकी 202 जागा मिळाल्या असून विरोधकांचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. भारतीय जनता पक्ष 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष असून त्या खालोखाल संयुक्त जनता दलाला 85 जागा मिळाल्या आहेत. लोकजनशक्ती पक्षाला 19, हिंदुस्थान अवाम मोर्चाला 5 तर राष्ट्रीय लोकमोर्चाला 4 जागांची प्राप्ती झाली आहे. विरोधी महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल 25 जागांसह आघाडीवर आहे. तर काँग्रेसला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले. डाव्या पक्षांची जागासंख्या 5 आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले होते. यावेळी बिहारच्या मतदारांनी मतदानाचा विक्रम करताना इतिहास घडविला होता. एकंदर साधारणत: 67 टक्के मतदान झाले होते, जे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील या राज्यातील सर्वाधिक मतदान आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मिळविलेल्या या घवघवीत यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन केले आहे. हा विजय आमची उत्तरदायित्वाची भावना वाढविणारा विजय असून आम्ही आता विकासासाठी अधिक नेटाने आणि निर्धाराने प्रयत्न करणार आहोत. राज्यातील जनतेने पुन्हा आमच्यावर जो वाढीव विश्वास व्यक्त केला आहे, तो आम्ही निश्चितच सार्थ ठरविणार आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
प्रारंभापासूनच आघाडी
शुक्रवारी सकाळी 8 वाजता राज्यातील विविध केंद्रांवर मतगणनेस प्रारंभ करण्यात आला होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रारंभापासूनच आघाडीवर राहिली. प्रथम ही आघाडी कमी जागांची होती. त्यामुळे निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत होते. तथापि, मतगणनेच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या. मध्यंतरी काही काळ तर आघाडीचे उमेदवार 212 मतदारसंघांमध्ये आघाडीवर होते. तथापि, अंतिमत: सत्ताधारी आघाडी 202 वर स्थिरावली.
भाजप सर्वात मोठा पक्ष
भारतीय जनता पक्ष हा आता बिहार विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून कार्यरत होणार आहे. या पक्षाने केवळ 101 जागांवर उमेदवार दिले होते. त्यांच्यापैकी 89 उमेदवार विजयी झाले. अशाप्रकारे भारतीय जनता पक्षाचे विजयाचे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे. 2010 च्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने 102 पैकी 91 जागा जिंकल्या होत्या. या विक्रमाची पुनरावृत्ती या पक्षाने पुन्हा एकदा करताना आपला प्रभाव सिद्ध केला आहे.
संजदच्याही वाढल्या जागा
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल या पक्षाने द्वितीय क्रमांकाच्या जागा पटकाविल्या आहेत. या पक्षानेही 101 जागांवर उमेदवार दिले होते. त्यांच्यापैकी 85 उमेदवार यशस्वी झाले आहेत. पक्षाचे अनेक नवे चेहरेही विजयी ठरले आहेत. अशाप्रकारे या पक्षानेही त्याच्या जागांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. नितीश कुमारांनी यामुळे अतीव समाधान व्यक्त केले आहे.
लोकजनशक्तीचा प्रभाव
दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती (रामविलास पासवान) या पक्षानेही या निवडणुकीत मोठे यश प्राप्त केले आहे. या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्ष म्हणून 29 जागांवर उमेदवार दिले होते. त्यांच्यापैकी 19 जणांना विजय मिळाला आहे. ही या पक्षाची विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे.
छोटे पक्ष, मोठी कामगिरी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील हिंदुस्थान अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय जन मोर्चा या दोन छोट्या पक्षांनी मोठी कामगिरी केली आहे. हिंदुस्थान अवाम मोर्चा या पक्षाने सहा जागा लढवून 5 जिंकल्या आहेत, तर राष्ट्रीय जनमोर्चाने त्याच्या 6 जागांपैकी 4 जागांवर विजय मिळविला आहे. या पक्षांनीही त्यांचे विक्रम नोंदविले.
विरोधकांचा अक्षरश: धुव्वा
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या झंझावातासमोर विरोधकांची ससेहोलपट झाली. यावेळी सत्तेवर येण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला त्याने लढविलेल्या 143 जागांपैकी केवळ 25 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसची अवस्था तर त्याहूनही दयनीय आहे. या पक्षाने 61 जागा लढवून केवळ 6 प्राप्त केल्या आहेत. डाव्या पक्षांचाही सफाया झाला असून त्यांना केवळ 5 मिळाल्या आहेत. या सर्व पक्षांच्या ‘महागठबंधन’ला एकंदर 36 जागांवर यश मिळले आहे.
मतांमध्येही आघाडी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घसघशीत मतांची प्राप्तीही झाली आहे. या आघाडीला एकंदर 47.5 टक्के मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाला 20.70 टक्के, संयुक्त जनता दलाला 19.3 टक्के, लोकजनशक्तीला 5.5 टक्के तर दोन छोट्या पक्षांना एकंदर 2 टक्के मते मिळाली आहेत. विरोधी महागठबंधनला साधारणत: 35 टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रीय जनता दलाला इतर कोणत्याही पक्षापेक्षा अधिक, म्हणजे 22.64 टक्के, तर काँग्रेसला 7.4 टक्के मते मिळाली आहे. डाव्या पक्षांना एकंदर 5 टक्के मते असल्याचे दिसून येते.
‘मतचोरी’ मुद्दा भुईसपाट
या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’ हा मुद्दा बराच ताणून धरण्याचा प्रयत्न केला होता. मतचोरी करुन भारतीय जनता पक्ष विजय मिळवितो. केंद्रीय निवडणूक आयोगही या पक्षाला मतचोरीत साहाय्य करतो, असे आरोप त्यांनी वारंवार केले होते. तसे काही ‘पुरावे’ देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तथापि, नंतर त्यांनी दिलेले पुरावे, निराधार असल्याचेही स्पष्ट झाले होते. तथापि, त्यांनी बिहारची संपूर्ण निवडणूकच या मुद्द्याभोवती केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्यात 16 दिवसांची ‘व्होट अधिकार यात्रा’ काढली होती. तथापि, मतदारांनी या मुद्द्याला मुळीच किंमत दिली नाही, हे आता स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्रीपदी नितीशकुमारच
या निवडणुकीत विविध पक्षांनी मिळविलेल्या जागांवर दृष्टिक्षेप केला असता असे दिसते, की भारतीय जनता पक्ष, लोकजनशक्ती आणि इतर दोन छोटे पक्ष यांच्या जागा एकत्र केल्या, तर बहुमताच्या जवळपास पोहचतात. याचाच, अर्थ असा की संयुक्त जनता दलाला वगळूनही भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जवळ पोहचत आहे. तथापि, निवडणुकीनंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, हे आश्वासन राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दिले आहे. तो शब्द पाळला जाईल. आघाडीतील कोणत्याही पक्षाला कितीही जागा मिळाल्या असल्या, तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील, असे भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने पुढचे सरकार नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात स्थानापन्न होणार, हे सुनिश्चित झालेले आहे.
जागांमध्ये घसघशीत वाढ
या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या जागांमध्ये मागच्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ संयुक्त जनता दलाच्या जागांमध्ये झाली आहे. गेल्या निवडणुकीत या पक्षाच्या 43 जागा होत्या. यावेळी त्यांच्यात 41 जागांची वाढ झाली आहे. भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीत 74 जागा मिळाल्या होत्या. नंतर पोटनिवडणुकांमधील यशामुळे ती संख्या 80 वर पोहचली. यावेळी या पक्षाला 92 जागा मिळाल्या असून गेल्या निवडणुकीपेक्षा त्या 18 ने अधिक आहेत. लोकजनशक्ती पक्षाला गेल्यावेळी एकही जागा नव्हती. यावेळी त्या पक्षाने 19 जागांवर यश प्राप्त केले. दोन छोट्या पक्षांच्या जगांमध्येही प्रत्येकी 1 जागेची वाढ झालेली दिसून येत आहे. 
विजयाचा जल्लोष
मतमोजणीवेळी शुक्रवारी दुपारी बारा नंतर जसजसे जागांचे चित्र स्पष्ट होऊ लागले, तसा दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष होऊ लागला. पक्षाचे प्रमुख नेते आणि असंख्य कार्यकर्ते एकत्र जमले. त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा करण्यास प्रारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयजयकार करण्यात आला. एकमेकांना मिठाई भरविण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विजयोत्सव साजरा कारण्यात या पक्षाच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने पुढे होत्या असे दिसून येत होते. त्याचप्रमाणे संयुक्त जनता दलाच्या पाटणा आणि दिल्लीतील कार्यालयांमध्ये जल्लोषी वातावरण होते.
विरोधी पक्षांमध्ये सन्नाटा
निवडणूक चुरशीची होईल अशी अपेक्षा बाळगलेल्या विरोधी पक्षांच्या कार्यालयांमध्ये मतगणनेला प्रारंभ झाल्यानंतर काही काळ गर्दी दिसून येत होती. पण जसजसे त्यांचे उमेदवार मोठ्या संख्येने मागे पडू लागले, तशी गर्दी कमी होत गेली. दुपारनंतर तर राजद आणि काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये सन्नाटा पसरला होता.
वक्फचा मुद्दा भोवला
बिहारमध्ये आम्ही निवडून आल्यास केंद्राने केलेला नवा वक्फचा कायदा रद्द करु अशी दर्पोक्ती तेजस्वी यादव यांनी केली होती. ती राष्ट्रीय जनता दलाला भोवली असे काही तज्ञांचे मत आहे. यादव यांच्या या घोषणेमुळे हिंदू मतदार त्यांच्यापासून अधिक प्रमाणात दुरावले, असेही अनेक पत्रकारांचे म्हणणे आहे.
लक्ष्य पश्चिम बंगाल आहे
बिहारमध्ये प्रचंड विजय मिळाल्याने उल्हसित झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता पुढचे लक्ष्य म्हणून पश्चिम बंगाल या राज्याची निवड केली आहे. या राज्यात पुढच्या वर्षीच्या एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाने जीव तोडून प्रयत्न करुनही या राज्यात यश मिळाले नव्हते. पश्चिभ बंगाल राज्य बिहारला लागूनच आहे. त्यामुळे आता या राज्यात यश मिळविण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करण्याचा निर्धार आहे.
जवळपास सर्व मंत्री विजयी
नितीश कुमार यांच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील 36 पैकी 34 मंत्री या निवणुकीत संघर्षात होते. त्यांच्यापैकी सर्वांनी विजय मिळविल्याचे दिसून येत आहे. विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी हे दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे लखीसराय आणि तारापूर मतदासंघांमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. दोन मंत्र्यांना तिकिटे देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या विजयाचा प्रश्न नव्हता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बहुतेक महत्वाचे आमदारही विजयी झाले आहेत.
नव्या विधानसभेतील पक्षीय बलाबल
एकंदर जागा 243
राष्ट्रीय लोकशाही आघाडी 202
भारतीय जनता पक्ष 89
संयुक्त जनता दल 85
लोकजनशक्ती 19
इतर पक्ष 9
महाआघाडी 36
राष्ट्रीय जनता दल 25
काँग्रेस 6
डावे पक्ष 5
अपक्ष अणि इतर 4
महिला शक्तीच्या पाठिंब्यामुळे…
या निवडणुकीत विक्रमी मतदानासमवेत महिलांनीही प्रचंड प्रमाणात मतदान केले होते. पुरुषांच्या मतदानापेक्षा त्यांचे मतदान 9 टक्क्यांनी अधिक झाले होते. एकंदर मतसंख्येतही महिलांनी यावेळी प्रथमच पुरुषांच्या वर ताण केली होती. हे वाढीव महिला मतदान प्रामुख्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच झाल्याचे दिसत आहे. यामुळे आघाडीला एवढा प्रचंड विजय मिळाला आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये बिहार सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या होता. रोजगारनिर्मितीसाठी 10 हजार रुपये देण्याची योजना विषेश लोकप्रिय होती. परिणामी, महिलांनी या आघाडीला विक्रमी मतदान केल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.