राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मिळतो

7 महिन्यांत तिसऱ्यांदा तुरुंगातून बाहेर

वृत्तसंस्था/ रोहतक

बलात्कार आणि हत्याप्रकरणी दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर पडला आहे. हरियाणाच्या रोहतक तुरुंगातून पॅरोलवर त्याला सोडण्यात आले आहे. चालू वर्षाच्या 8 महिन्यांमध्ये तो तिसऱ्यांदा तुरुंगातून बाहेर पडला आहे. खास बाब म्हणजे पूर्वी मिळालेला फरलो आणि पॅरोलमध्ये त्याला सिरसा येथे येण्याची अनुमती नव्हती. परंतु यावेळच्या पॅरोलवर तो डेराच्या सिरसा आश्रमातच राहणार आहे.

बाबा राम रहीम 2017 मध्ये शिक्षा झाल्यापासून 14 व्यांदा तुरुंगातून बाहेर पडला आहे. मागील वेळी राम रहीमला पॅरोल केवळ तीन महिन्यांपूर्वी मिळाला होता. यावेळी हरियाणा सरकारने त्याला 40 दिवसांचा पॅरोल दिला आहे. राम रहीमचा 15 ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. शिक्षा झाल्यावर राम रहीम पहिल्यांदाच सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या आश्रमात राहणार आहे.

2017 साली राम रहिमला दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेनंतर पंचकूला आणि सिरसा येथे मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. या हिंसेत जवळपास 20 जण मृत्युमुखी पडले होते. तर 2019 मध्ये पत्रकार रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी राम रहीमला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Comments are closed.