राम मंदिराचे मुख्य याजक सत्यांद्र दास यांचे निधन झाले
आज अयोध्येमध्ये होणार अंत्यसंस्कार
वृत्तसंस्था/ लखनौ
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे बुधवार, 12 फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते लखनौ पीजीआयमध्ये उपचार घेत होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे अयोध्येत शोककळा पसरली आहे. सत्येंद्र दास गेल्या 32 वर्षांपासून रामजन्मभूमी येथे मुख्य पुजारी म्हणून काम करत होते.
आचार्य सत्येंद्र दास यांचे पार्थिव पीजीआय लखनौ येथून अयोध्येत आणण्यात येणार असून गुरुवारी अयोध्येतील शरयू नदीकाठी त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. गेल्या आठवड्यात 2 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना लखनौ पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम सज्ज ठेवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सत्येंद्र दास यांचे बुधवारी सकाळी 8 वाजता निधन झाले. त्यांचे शिष्य त्यांचे पार्थिव अयोध्येला घेऊन निघाले आहेत. रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
राम मंदिरासाठीचे संपूर्ण सार्वजनिक आंदोलन त्यांच्या डोळ्यादेखत घडले असून त्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी विध्वंसाच्या वेळी, आचार्य सत्येंद्र दास रामलल्लाला कवेत घेऊन पसार झाले होते. रामलल्ला तंबूत असल्यापासून ते भव्य मंदिरात बसेपर्यंत आचार्य सत्येंद्र दास याचे साक्षीदार होते.
सेंट कबिरनगरचा जन्म झाला
मिळालेल्या माहितीनुसार, आचार्य सत्येंद्र दास यांचा जन्म संत कबीरनगर येथे झाला. त्यांचा जन्म 20 मे 1940 रोजी झाला. लहानपणापासूनच ते भक्तीने प्रेरीत होते. त्यांचे वडील अयोध्येला वारंवार येत असत व तेही आपल्या वडिलांसोबत अयोध्येत येत होते. लहानपणापासूनच त्यांनी आपले जीवन रामभक्तीसाठी समर्पित केले होते.
Comments are closed.