राम मंदिरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य सोहळा येत्या मंगळवारी, लक्षावधी रामभक्तांची उपस्थिती शक्य वृत्तसंस्था
अयोध्या (उत्तर प्रदेश)
अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी साकारलेल्या भव्य राममंदिच्या ध्वजारोहण समारंभाचा प्रारंभ करण्यात आला आहे. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम येत्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी नवग्रह पूजनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. मुख्य सोहळ्याला लक्षावधी रामभक्त उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने सर्व व्यवस्था केली आहे.
शुक्रवारपासूनच धार्मिक अनुष्ठानांचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्या दिवशी मंदिराच्या परिसरात असणाऱ्या यज्ञशाळेत अयोध्या आणि श्रीक्षेत्र काशी येथील विद्वानांच्या उपस्थितीत धार्मिक अनुष्ठाने करण्यात आली आहेत. आज रविवारी आणि सोमवारीही धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य यजमान श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सपत्निक नवग्रहांचे पूजन केले. या पूजनासह पंचदिवसीय रामजन्मभूमी ध्वजारोहण सोहळ्याचा प्रारंभ झाला आहे.
शिखरावर होणार ध्वजारोहण
श्री राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केले जाणार आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे. तो पर्यंत अखंड अनेक धार्मिक अनुष्ठाने केली जाणार आहेत. या ध्वजारोहणासाठी शरयू नदीच्या जलाने भरलेला कलश मिरवणुकीने राम मंदिरात आणण्यात आला आहे. ही कलश यात्रा पाहण्यासाठी अयोध्येत प्रचंड संख्येने भाविक जमा झाले. जलकलशाच्या पुढे अनेक युवक रामध्वजेचे प्रतीक हाती घेऊन समाविष्ट झाले होते. डॉ. मिश्र यांनी जलकलश स्वत:च्या मस्तकावर धारण केला होता. असंख्य लोकांनी या जलकलश मिरवणुकीत भाग घेतला. प्रत्यक्ष ध्वजारोहणाच्या आधी पाच दिवस अशा प्रकारच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले गेले.
अभिजित मुहूर्तावर होणार ध्वजारोहण
मंगळवारी दुपारी 12 ते 12.30 या कालावधीत अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बटण दाबून ध्वजारोहण करणार आहेत. या कार्यक्रमाची सर्व सज्जता आता पूर्ण करण्यात आली आहे. ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्याचा सरावही करण्यात आला आहे. सर्व यंत्रणा योग्य प्रकारे कार्य करीत आहे, याची शाश्वती करुन घेण्यासाठी सराव आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमासाठी अयोध्येत येणार आहेत.
कोणी केली रामध्वजाची निर्मिती…
या पवित्र रामध्वजाची निर्मिती 6 कारागिरांनी केली आहे. या कारागिरांचाही सत्कार करण्यात येणार आहे. कोणत्याही वातावरणात, पावसात, वादळात किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा प्रसंगात या ध्वजाला काहीही होणार नाही, तसेच त्याचा वर्ण धूसर होणार नाही, अशा प्रकारे त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या ध्वजाची प्रतिमाही आता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ध्वजारोहण समारंभाबद्दल उत्सुकता
श्रीरामध्वजाची निर्मिती शास्त्रानुसार, त्याचे स्वरुप भव्य आणि आकर्षक
मंगळवारी दुपारी 12 ते 12.30 या वेळेत अभिजित मुहूर्तावर आरोहण
कार्यक्रमाची सर्व व्यवस्था सज्ज, सुरक्षा व्यवस्थाही बळकट ठेवली जाणार
श्रीरामध्वजाची निर्मिती 6 कारागिरांकडून, त्यांचाही केला जाणार सत्कार
असे आहे रामध्वजाचे स्वरुप
राममंदिराच्या शिखरावर आरोहित केल्या जाणार असलेल्या रामध्वजाची लांबी 22 फूट तर रुंदी 11 फूट आहे. हा ध्वजही आता राममंदिर परिसरात आणला गेला आहे. या ध्वजाची निर्मिती रेशमी कापडापासून करण्यात आली असून तो त्रिस्तरीय आहे. या ध्वजाचा वर्ण भगवा पितांबरी असून तो पहाटेच्या वेळी पूर्वेला उगवलेला सूर्य ज्या रंगाचा असतो, त्यासमान आहे. या ध्वजात पॅरेशूट धाग्यांचा एक स्तर लावण्यात आला आहे. या ध्वजावर हस्तकारीच्या माध्यमातून भगवान श्रीराम यांच्या राजवंशाचे चिन्ह असणारा कोविदार वृक्ष, सूर्यदेवाचे प्रतीक असणारे चिन्ह आणि या रामध्वजाच्या मध्यभागी ॐ हे चिन्ह विणण्यात आले आहे.
Comments are closed.