राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार, रामदास आठवलेंचा दावा; म्हणाले, मुंबई महापालिके
राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर रामदास आठवले: गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढत्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि मनसे (MNS) यांच्यात युती होण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात असताना, यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठा दावा केला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत मराठी मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा थेट फायदा महायुतीला होईल, असे आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले. राज ठाकरेंना सोबत घेण्याची चूक उद्धव ठाकरेंनी करू नये होती. राज ठाकरे उद्धव ठाकरेसाठी फायदेशीर ठरणार नाहीत, उलट त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान होईल, असा दावा त्यांनी केला.
रामदास आठवले म्हणाले की, “राज ठाकरे आमच्यासोबत लोकसभेला होते, तेव्हा आम्हाला फारसा फायदा झाला नाही. मात्र विधानसभेला राज ठाकरे आमच्यासोबत नसतानाही आम्हाला चांगला फायदा झाला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत युती ही निवडणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरेलच असे नाही.” असे देखील त्यांनी म्हटले आहे.
Ramdas Athawale on BMC Election: मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबई हिसकावून घेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. “मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल, हे निश्चित आहे,” असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईत 25 जागांपैकी किमान 16 जागा आरपीआयला मिळाव्यात, अशी आमची मागणी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Ramdas Athawale on Prakash Ambedkar: रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांवर निशाणा
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या आधारावर केले? असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला. “भाजप सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडेल असे मला वाटत नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
Ramdas Athawale on Rahul Gandhi: मतचोरीच्या आरोपांवर राहुल गांधींना सवाल
मतदार यादीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, “मतांची चोरी झाली नाही पाहिजे, मतदार यादी दुरुस्त केली पाहिजे, हे योग्य आहे. मात्र राहुल गांधी सतत मतचोरी झाल्याचे आरोप करतात. मग लोकसभा निवडणुकीत काय मतचोरी झाली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Ramdas Athawale on BJP: भाजप छोटे पक्ष संपवत नाही, मी पक्ष वाढवतोय
“आम्ही सत्तेत नसू, पण महायुतीमध्ये आहोत. भाजप छोटे पक्ष संपवत आहे, असे बोलले जाते. मात्र मी माझा पक्ष वाढवला आहे,” असे सांगत आठवले यांनी आरपीआयच्या विस्तारावर भर दिला. दोन राज्यांमध्ये मान्यता मिळाल्यास आरपीआयला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सांगली महापालिकेत आरपीआयला 5 ते 6 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.