26/11 च्या हल्ल्यांमध्ये राणा मुंबईत राहत होता.

एनआयए चौकशीत धक्कादायक बाब उघड : मुंबई गुन्हे शाखेकडूनही चौकशी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्यावेळी दहशतवादी तहव्वूर राणा मुंबईत होता, अशी माहिती एनआयए चौकशीदरम्यान उघड झाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात असलेल्या राणाची मुंबई गुन्हे शाखेकडूनही चौकशी केली जात आहे. यामध्ये त्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या आहेत. आपण स्वत: छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या ठिकाणी जाऊन रेकी केल्याचेही त्याने कबूल केले आहे. आपण पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट असल्याचे त्याने मान्य केले आहे. तसेच आपला साथीदार डेव्हिड कोलमन हेडलीसोबत लष्कर-ए-तोयबाच्या अनेक दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झाल्याची कबुलीही त्याने दिली.

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा आणि कॅनडाचा रहिवासी आहे. अमेरिकेने एप्रिल 2025 मध्ये त्याला भारताच्या ताब्यात दिले असून सध्या विविध तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जात आहे. तहव्वूरला ऑक्टोबर 2009 मध्ये अमेरिकन एजन्सी एफबीआयने अमेरिकेतील शिकागो येथे अटक केली होती. राणाला 10 एप्रिल रोजी अमेरिकेतून एका विशेष विमानाने भारतात आणण्यात आले होते. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राणाचा जबाब नोंदवला आहे. राणाने हेडलीला त्याच्या इमिग्रेशन व्यवसायाद्वारे मुंबईत कार्यालय उघडण्यास मदत केली होती. त्या कार्यालयाचा वापर हल्ल्याचा कट रचण्यासाठी करण्यात आला होता.

राणाने आपण पाकिस्तानी सैन्याचा एजंट असल्याचे कबूल केले आहे. तसेच  त्याने डेव्हिड कोलमन हेडलीसोबत पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाचे अनेक प्रशिक्षण सत्र घेतले होते. तसेच त्याने एनआयए चौकशीदरम्यान मुंबईत असल्याची कबुली दिल्याने तपासात सहभागी असलेली मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता राणाला अटक करून त्याला रिमांडवर घेण्याची तयारी करत आहे. राणा सध्या एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली न्यायालयाने त्याची कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवली आहे.

लष्कर-ए-तोयबाचे आयएसआयशी नजीकचे संबंध

एनआयएच्या सूत्रांनुसार, लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय यांच्यात खोलवरचे संबंध आहेत. 2005 पासून मुंबई हल्ल्याचा कट रचला जात होता. 26/11 हल्ल्याच्या वेळी तो मुंबईत होता अशी कबुली त्याने दिली आहे. एनआयएने राणाची सखोल चौकशी केली आहे. राणा आणि हेडली यांच्यातील ईमेल पत्रव्यवहार, प्रवास तपशील आणि इतर पुरावे यांचे विश्लेषण केले जात आहे. राणावर गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्यांचे गंभीर आरोप आहेत. राणाच्या चौकशीतून हल्ल्यामागील व्यापक कट उघड होऊ शकतो. राणाच्या प्रत्यार्पणामुळे 26/11 हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट होईल.

मुंबईत उघडले इमिग्रेशन सेंटर

राणाने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने स्वत:च्या योजनेनुसार मुंबईत त्याच्या कंपनीचे इमिग्रेशन सेंटर उघडले. या माध्यमातून हल्ल्याच्या तयारीसाठी जागा आणि सुविधा उपलब्ध करण्याचा त्याचा मानस साध्य झाला. तिथे केलेले व्यवहार व्यवसायिक खर्चात दाखवण्यात आले होते. डेव्हिड हेडली हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार होता. तहव्वूर हा त्याचा मित्र होता. त्याने त्याला हा हल्ला घडवून आणण्यास मदत केली. हेडली लष्कर-ए-तोयबासोबत काम करत आहे हे राणाला माहित होते. हेडलीला मदत करून आणि त्याला आर्थिक मदत देऊन, राणा दहशतवादी संघटनेला आणि त्याच्यासोबत असलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता.

Comments are closed.