हनुमान जयंतीच्या दिवशी प्रेक्षकांना होणार रामाचे दर्शन, रामायणच्या टीझरचा सोशल मीडियावर शंखनाद
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण: भाग 1’ या पौराणिक चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर सेटवरील काही फोटो लीक झाल्यानंतर चाहते रणबीर कपूरच्या अधिकृत लूकची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी चाहत्यांची ही प्रतीक्षा संपवली असून, रणबीर कपूरचा ‘श्रीराम’ लूक आणि चित्रपटाचा भव्य टीझर अधिकृतपणे प्रदर्शित केला आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये चित्रपटाची भव्यता प्रकर्षाने जाणवते. रामायणातील ऐतिहासिक काळ जिवंत करण्यासाठी अत्याधुनिक VFX चा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संगीतकार ए.आर. रहमान आणि हंस झिमर यांनी दिलेले पार्श्वसंगीत प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. 2 मिनिटे 38 सेकंदांच्या या टीझरमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत अतिशय देखणा दिसत आहे. टीझरची सुरुवात जगातील वाढत्या राक्षसी आक्रमणाने आणि अशांततेने होते. “जेव्हा जेव्हा जग अशांत होते, तेव्हा प्रभू राम सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणून उदयास येतात,” असा संदेश देत हा टीझर प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. यामध्ये रणबीर कपूरच्या ‘सीता विवाह’ प्रसंगातील रूपापासून ते ‘वनवासातील’ साध्या आणि तेजस्वी लूकपर्यंतचे विविध पैलू नितेश तिवारी यांनी अत्यंत सुंदररीत्या टिपले आहेत.
चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर हा टीझर शेअर करताना प्रभू श्रीरामांच्या महानतेवर एक भावनिक संदेशही लिहिला आहे. प्रभू श्रीराम हे सर्वांत श्रेष्ठ होते आणि त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय नेहमीच व्यापक हितासाठी होते, असे सांगताना त्यांनी रामाच्या कर्तव्यदक्षतेचा आणि त्यागाचा गौरव केला आहे. नितेश तिवारी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रामायणाकडे पाहण्याचा एक नवीन आणि भव्य दृष्टिकोन जगासमोर मांडण्यासाठी सज्ज झाला असून, या पहिल्या झलकने प्रेक्षकांमधील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
Comments are closed.