जम्मू आणि काश्मीरने रचला इतिहास! 67 वर्षांमध्ये पहिल्यांदाच बनले रणजी ट्रॉफीचे चॅम्पियन

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात इतिहास रचला गेला आहे. कारकिर्दीत प्रथमच अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या जम्मू-काश्मीरने थेट विजेतेपद पटकावले आहे. यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात आठ वेळेचा विजेता कर्नाटकला चांगलीच टक्कर दिली आहे. या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार जम्मू-काश्मीरच्या शुभम पुंडीरला मिळाला. त्याचबरोबर त्यांचा वेगवान गोलंदाज आकिब नबी मालिकावीर ठरला.
कर्नाटकविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिल्यानंतर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे जम्मू आणि काश्मीरने पहिले रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात जम्मू-काश्मीरने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही कमाल केली आहे. त्यांनी पहिल्या डावात ५००पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावसंख्येवरच संपुष्टात आला होता. यामुळे जम्मू-काश्मीरने पहिल्याच डावात आघाडी घेतली. त्यांनी दुसऱ्या डावातही फलंदाजी केली आणि ४ विकेट्स गमावत ३४२ धावा केल्या.
आज (२८ फेब्रुवारी) सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस होता, मात्र कर्नाटकच्या गोलंदाजांना जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांची भागीदारी तोडण्यात अपयश येत राहिले. शेवटी जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोग्रा आणि कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पड्डीकल यांनी सामना ड्रॉ करण्याचा निर्णय एकमताने घेतला.
या सामन्यात जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यामध्ये शुभमने १२१ धावा केल्या होत्या. तसेच यावेर हसन, पारस, अब्दुल समाद, कन्हैय्या वाधवान आणि साहिल लोटरा यांनी अर्धशतके केली होती. यावेळी कर्नाटककडून सर्वाधिक विकेट्स प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या. त्याने ३४.१ षटकात ९८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे पहिल्या डावात जम्मू-काश्मीरने सर्व विकेट्स गमावत ५८४ धावा केल्या. त्याबदल्यात कर्नाटककडून केवळ मयंक अग्रवालने उत्तम खेळी केली.
मयंकने सलामीला येताना १६० धावा केल्या होत्या, मात्र कर्नाटकचे बाकी प्रमुख फलंदाज केएल राहुल, करुण नायर, पड्डीकल आणि स्मरण रवीचंद्रन धावा करण्यात अपयशी ठरले. यामुुळे त्यांना ३००चा आकडाही गाठता आला नाही. या डावात पुन्हा एकदा आकिबची गोलंदाजी उत्तम राहिली. त्याने २३ षटकात ५४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याने राहुल, मयंक, करुण आणि स्मरण यांच्या विकेट्स घेतल्या.
मोठी आघाडी असतानाही जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. यामध्ये सलामीवीर कामरान इक्बालने नाबाद १६० धावा केल्या. या डावात कर्नाटककडून प्रसिद्धने ४ पैकी २ विकेट्स घेतल्या. तसेच त्यांच्या ८ खेळाडूंनी गोलंदाजी केली, मात्र जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांना बाद करण्यात त्यांना यश आले नाही.
या स्पर्धेत जम्मू-काश्मीरने उपांत्य-पूर्व फेरीत मध्य प्रदेशला मध्य प्रदेशमध्ये, उपांत्य फेरीत बंगालला बंगालमध्ये आणि आता अंतिम फेरीत कर्नाटकला कर्नाटकमध्ये पराभूत केले आहे. तसेच ते या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच पोहोचले होते आणि ६७ वर्षांनंतर विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. तसेच कर्नाटकची अंतिम फेरीत पोहोचण्याची ही १५वी वेळ होती.
Comments are closed.