सरफराज खानचे घणाघाती द्विशतक! हैद्राबादचे गोलंंदाज संकटात, मुंबई 400 पार
भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चे सामने सुरू आहेत. यामध्ये गुरूवारपासून (२२ जानेवारी) मुंबई विरुद्ध हैद्राबाद या सामन्याला सुरूवात झाली आहे. हा सामना आधीच हैद्राबादच्या कर्णधारामुळे चर्चेत आला आहे. आता त्यात सरफराज खानने द्विशतकी खेळी करत भर टाकली आहे.
हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. यामध्ये हैद्राबादचे नेतृत्व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज करत आहे. त्याच्या कारकिर्दीत तो प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असल्याने क्रिकेटविश्वात या सामन्याबाबत कुतूहल निर्माण झाले. त्यामध्ये मुंबईने पहिल्या डावात धावांचा डोंगर रचला आहे. त्याच्यामागे सरफराजची स्फोटक फलंदाजी आहे.
सरफराजने स्थानिक क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करत आहे. तो २०८ चेंडूत नाबाद २०५ धावा करत हैद्राबादच्या गोलंदाजांना त्रास देत आहे. यामध्ये त्याने १९ चौकार आणि ६ षटकार मारले आहेत.
सरफराजने याआधी विजय हजारे ट्रॉफीमध्येही फलंदाजीत धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने गोवा संघाविरुद्ध १५७ धावा, उत्तराखंडविरुद्ध ५५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्ध ७३ आणि हरियाणाविरुद्ध ६४ धावांची खेळी केली होती.
सरफराज भारताच्या कसोटी संघाचा भाग आहे. त्याने ६ सामन्यांत ३७.१०च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने एक शतक आणि ३ अर्धशतके केली आहेत. त्याने भारतासाठी शेवटचा सामना २०२४मध्ये खेळला होता. अशा या धमाकेदार फलंदाजाकडे संघनिवड अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत आले आहेत. त्याने आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये लय कायम राखत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या सामन्यात सिराजने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय मुंबईच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवल्याचे दिसते. मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाडनेही शतकी खेळी केली. त्याने १०४ धावा केल्या आहेत. शेवटचे वृत्त हाती आले असता मुंबईने ५ विकेट्स गमावत ४६५ धावसंख्या उभारली आहे.
याच स्पर्धेत पंजाबकडून खेळणारा भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल मात्र अपयशी ठरला. तो सौराष्ट्राविरुद्ध दोन चेंडू खेळताच शून्यावर बाद झाला.
Comments are closed.