Ranji trophy 2025-26 – द्विशतकांचा पंजा! सरफराज खानची दुहेरी जुगलबंदी, हैदराबादला धुवून काढलं

सरफराज खान नावाच वादळ मागील काही महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोंगावत आहे. त्याची धावांची भूक काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. त्याची बॅट पुन्हा एकदा तळपली असून त्याने हैदराबादविरुद्ध धडाकेबाज द्विशतक झळकावलं आहे. सरफराजच्या झंजावती फलंदाजीमुळे मुंबई मजबूत स्थितीमध्ये आली आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबईविरुद्ध हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईची सुरुवात खराब झाली. संघाला अवघ्या 82 धावांवर तीन मोठे हादरे बसले. त्यामुळे संघ काहीसा अडचणीत आला होता. मात्र, सरफराज खानने संघाची सर्व सुत्र आपल्या हाती घेतली आणि खिंड लढवण्यास सुरुवात केली. संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत त्याने पहिला दिवस गाजवला आणि 142 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या दिवशीही त्याची हिच लयबद्ध फलंदाजी सुरूच राहिली आणि त्याने 206 चेंडूंमध्ये आपलं पाचवं द्विशतक झळकावलं. त्याने 219 चेंडूंमध्ये 19 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 227 धावांची दमदार खेळी केली.
सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाच द्विशतके पूर्ण केली. त्याचा रणजी क्रिकेटमधला खेळ चांगलाच बहरला असून त्याने चालू हंगामात 8 डावांमध्ये 400 हून अधिका धावा चोपून काढल्या आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 5000 धावांचा टप्पाही पार केला आहे. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 17 शतके आणि 16 अर्धशतके आहेत.

Comments are closed.