मुंबईची गाठ हरयाणाशी, जम्मू-कश्मीर उपांत्यपूर्व फेरीत

मेघालयाविरुद्धच्या महाविजयांनतर मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित झालाच होता. आज जम्मू-कश्मीरने बडोद्याचा दुसरा डाव 182 धावांत गुंडाळला आणि रणजी करंडकाच्या इतिहास तिसऱयांदा बाद फेरीत धडक मारण्याची किमया साधली. त्यामुळे आता मुंबईची गाठ हरयाणाशी पडेल. जम्मू-कश्मीर केरळशी भिडेल तर विदर्भ -तामीळनाडू आणि सौराष्ट-गुजरात अशा उपांत्यपूर्व लढती होतील. आता येत्या 8 फेब्रूवारीपासून रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जातील.

जम्मू-कश्मीरने ‘अ’ गटात आणखी एक धक्कादायक विजय नोंदवताना बडोद्याचा 182 धावांत डाव गुंडाळला. शनिवारी त्यांनी बडोद्यासमोर 365 धावांचे जबर आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना बडोद्याची 2 बाद 58 अशी अवस्था होती. आज त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी 307 धावांची आवश्यकता होती, पण शनिवारी दोन विकेट टिपणाऱ्या साहिल लोट्राने आजही आणखी पाच विकेट घेत बडोद्याचा डाव 182 धावांवरच संपवला. पहिल्या डावात 26 धावांत 4 विकेट घेणाऱया साहिलने दुसऱया डावात 75 धावांत 7 विकेट घेत जम्मू-कश्मीरला पाच वर्षांनंतर प्रथमच बाद फेरी गाठून दिली. जम्मू-कश्मीरच्या या जबरदस्त कामगिरीमुळे बडोदा साखळीतच बाद झाला.

Comments are closed.