मुंबई महाविजयासमीप

सिद्धेश लाड (145), आकाश आनंद (103) आणि शम्स मुलानी (नाबाद 100) यांची शतके आणि अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर यांची हुकलेली शतके यांच्या खेळाच्या जोरावर मुंबईने कमकुवत मेघालयासमोर 7 बाद 671 धावांचा एव्हरेस्ट उभा करत रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील महाविजयाच्या दिशेने कूच केली. पहिल्या डावात 585 धावांची प्रचंड आघाडी घेतल्यानंतर मुंबईने मेघालयाची दुसऱ्या डावात 2 बाद 27 अशी अवस्था केल्यामुळे उद्या रणजी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबई डाव आणि 500 पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवणार हे निश्चित मानले जात आहे.

गुरुवारी मेघालयाचा 86 धावांत खुर्दा पाडल्यानंतर मुंबईने दिवसअखेर 2 बाद 213 अशी मजल मारली होती. आज मुंबईने षटकामागे 6 धावा काढताना 80.5 षटकांत 458 धावा चोपून काढल्या. गुरुवारी नाबाद असलेल्या सिद्धेश लाडने आपले दहावे प्रथम श्रेणी शतक साजरे केले, मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेचे 41 वे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. सिद्धेशने अजिंक्यबरोबर 196 धावांची भागी रचली. मग आकाश आनंदबरोबर 86 धावांची भागी केली. सिद्धेश 145 धावांवर बाद झाल्यावर दुसराच रणजी सामना खेळत असलेल्या आकाशनेही आपले पहिले शतक साकारले तर शार्दुल ठाकूरने  42 चेंडूंत 5 षटकार आणि  9 चौकार ठोकत 84 धावा वसूल केल्या. आकाश आणि सूर्यांश शेडगेने 123 धावांची भर घातली. आकाश 103 तर सूर्यांश 61 धावांवर बाद झाला.

Comments are closed.