Ranji Trophy Final: बिकट परिस्थितीत मयंक अग्रवालचे जम्मू-काश्मीरविरुद्ध शतक, पड्डीकल-राहुल फेल

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामातील अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यात खेळला जात आहे. या सामन्याचा आज (२६ फेब्रुवारी) तिसरा दिवस असून ८ वेळेचा रणजी ट्रॉफी विजेता कर्नाटक अडचणीत आला आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यामध्ये शुभम पुंडीरच्या १२१ धावांच्या जबरदस्त खेळीमुळे त्यांनी पहिल्या डावात ५८४ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात कर्नाटकची सुरूवात निराशाजनक झाली, मात्र सलामीवीर मयंक अग्रवाल टीकून आहे. त्याने शतकी खेळी केली असून कर्नाटकला काहीसा दिलासा मिळाला आहे.
मयंकचे हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील २१वे शतक ठरले आहे. कर्नाटकची स्थिती पहिल्याच डावात कठीण असून त्याचे हे शतक महत्वाचे आहे. जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने कर्नाटकच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. केएल राहुल १३ धावा करत बाद झाला. त्यामुळे सुरूवातीलाच विकेट पडल्याने कर्नाटकवर दडपण आले होते. ते काही कमी होताना दिसले नाही, कारण एका बाजूने त्यांच्या विकेट्स पडतच राहिल्या आणि दुसऱ्या बाजूने मयंकने त्याचा लढा सुरूच ठेवला.
मागील सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे कर्नाटकचे कर्णधार देवदत्त पड्डीकल आणि स्मरण रविचंद्रन लवकरच बाद झाले. स्मरणला तर भोपळाही फोडता आला नाही. तसेच करुण नायरही शून्यावर बाद झाला. त्यामुळे कर्नाटकच्या ५७ धावांवर ४ विकेट्स पडल्या होत्या. अशा परिस्थितीत मयंकने संयमी खेळी करत १५३ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या.
मयंकने आतापर्यंत १२४ प्रथम श्रेणीचे सामने खेळले असून त्यामध्ये ४५च्या सरासरीने ८८०० धावा केल्या आहेत. यात २१ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ३०४ राहिली आहे. हे त्याने २०१३मध्ये कर्नाटककडून खेळताना झारखंडविरुद्ध केल्या होत्या.
जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळत आहे. दोन्ही संघाची उपांत्य फेरीतील कामगिरी पाहता कर्नाटकची फलंदाजी विरुद्ध जम्मू-काश्मीरची गोलंदाजी असे समीकरण होते, मात्र जम्मू-काश्मीर दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. सध्या कर्नाटकचा पहिला डाव सुरू असून त्यांनी ५ विकेट्स गमावत २०३ धावा केल्या आहेत. मयंक १२३ धावा आणि कृथिक कृष्णा १७ धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत.
Comments are closed.