VIDEO: रणजी ट्रॉफी फायनलमध्ये ट्वीस्ट! केएल राहुलने केली बॉलिंग, 11 वर्षानंतर फर्स्ट क्लासमध्ये सक्तीने…

केएल राहुल एक विकेटकीपर-फलंदाज म्हणून सर्वांना माहितच आहे. सध्या तो भारतीय संघातून बाहेर असून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत आहे. भारतीय क्रिकेटमधील मानाची स्थानिक स्पर्धा रणजी ट्रॉफीच्या २०२५-२६च्या अंतिम फेरीचा सामना सुरू आहे. हा सामना कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राहुलचे एक नवे रुप पाहायला मिळाला आहे. त्याने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली नसेल, मात्र आज (२८ फेब्रुवारी) त्याने गोलंदाजीत हात आजमावला.

कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर सामना हुबळीमध्ये सुरू आहे. आजचा या सामन्याचा शेवटचा दिवस असून राहुलने दोन षटके गोलंदाजी केली आहे. त्याने ऑक्टोबर २०१५नंतर आता प्रथम श्रेणीमध्ये गोलंदाजी केली आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीरचे फलंदाज चांगलेच फॉर्ममध्ये दिसत आहेत. यामुळे कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पड्डीकलने राहुलला गोलंदाजी करण्यास सांगितले. त्याने पहिल्या षटकात ३ धावा दिल्या, त्यामुळे त्याने दुसरे षटकही टाकले आणि त्यात १० धावा दिल्या.

राहुलच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये एक विकेटही आहे. तसेच त्याने प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीत गोलंदाजी केली आहे, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. रणजी ट्रॉफीमध्ये त्याला विकेट मिळाली असती, परंतु मयंक अग्रवालने तो झेल सोडला. तरीही राहुलच्या या गोलंदाजीची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

राहुलने क्रमांक एक पासून सातपर्यंत फलंदाजी केली आहे. तो विकेटकीपर तर आहेत, तसेच त्याने नेतृत्वही केले आहे आणि आता तो गोलंदाजी करत आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या ९ डावांमध्ये गोलंदाजी केली आहे. त्याला आता १० वर्ष झाली आहे. त्याची ही ऑफ-स्पिन गोलंदाजी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

या सामन्यात जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यामध्ये पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला. त्याबदल्याच कर्नाटकचा पहिला डाव २९२ धावसंख्येवरच संपुष्टात आला. यावरून जम्मू-काश्मीर फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही कमाल करत आहेत. तसेच त्यांचा दुसरा डाव सुरू असून ६२३ धावांची आघाडी घेतली आहे. यामुळे आठ वेळेचा विजेता कर्नाटकचा पराभव निश्चित आहे.

Comments are closed.