रस प्यायला ये म्हणलं माय… चेंगळ्या अन् मोगराला नेटीझन्सनी घेतलं डोक्यावर

>> नवनाथ शिंदे

सोशल मीडियावर कोण कधी ट्रेंडिंगमध्ये येईल हे सांगता येत नाही. अशाच दोनजणांनी संपूर्ण मार्केट ‘जाम’ केले आहे. आपल्या ‘गावरान’ भाषेत त्यांनी नेटीझन्सची मने आकर्षित करून घेतली आहेत. ‘चेंगळ्या बोले कुहू’ अन् ‘रस प्यायला ये म्हटलं माय…’ या वाक्यांनी इन्स्टाग्राम, फेसबुक, थ्रेडवर राडा घातला आहे. चेंगळ्या आणि मोगराला नेटीझन्सनी डोक्यावर घेतलं असून, आता संबंधित यूट्यूबर्सची हवा डीजेवरही झाली आहे. त्यांनी बोललेल्या वाक्यावर गाणं तयार झालं असून, विविध कार्यक्रमांत ते वाजवलंही जात आहे.

इन्स्टाग्रामवर संबंधित मुलगा ‘चेंगळ्या 2008’ ही आयडी असून, त्याला तब्बल एक लाख 86 हजार फॉलोअर्स आहेत. सुरुवातीला काही व्हिडीओ करत असताना त्याने ‘चेंगळ्या बोले कुहू…’ असं म्हणत व्हिडीओ पोस्ट केला होता. संबंधित पोस्टला नेटीझन्सनी डोक्यावर घेतलं. अवघ्या काही दिवसांत त्याला लाखो लोकांनी पाहिल्यानंतर चेंगळ्याला फॉलो करण्यास सुरुवात केली. आता तो सुप्रसिद्ध यूट्यूबर झाला आहे. विविध हॉटेल्स दुकानांच्या उद्घाटन समारंभाला त्याला बोलावलं जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी डीजेवरसुद्धा ‘चेंगळ्या बोले कुहू…’ हे गाणं तयार करण्यात आलं आहे.

‘रस प्यायला ये म्हणलं माय…’ या वाक्याने तर संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक नेटकऱ्यांकडून एकमेकांना संबंधित आवाजातील हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. दरम्यान, प्रचंड ऊन लागत असल्यामुळे एका रसाच्या गाड्यावर भरलेला ग्लास हातात घेऊन ‘रस प्यायला ये म्हणलं माय…’ असं मोगाराने म्हटलं आहे. नेमकं तेच वाक्य पकडून नेटकऱ्यांनी मोगराला व्हायरल केलं आहे. सोशल मीडियासह तमाशा, नाट्य, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतही आवडीने हे शब्द डीजेवर वाजवले जात आहेत. अवघ्या काही महिन्यांत मोगराच्या फॉलोअर्समध्ये घसघशीत वाढ झाली आहे.

चेंगळ्याची स्टाइल अन् मोगराचा आवाज

डायलॉग पूर्ण झाल्यानंतर संबंधित तरुणाकडून ‘चेंगळ्या बोले कुहू…’ असं म्हणतानाच उजव्या हाताची दोन बोटं उचलून अॅक्शन केली जात आहे. त्यानुसार नेटकऱ्यांनी शेकडो कमेंट्स अन् लाइक्सचा पाऊस पाडून चेंगळ्याला फेमस केलं आहे. तर, मागील अनेक महिन्यांपासून ‘मोगरा… मोगरा…’ असं म्हणत संबंधित यूट्यूबरने व्हिडीओंचा धडाका सुरू केला होता. त्यातच रस पिण्याआधी त्याने ‘रस प्यायला ये म्हणलं माय…’ अशा घोगऱ्या आवाजातील डायलॉगला अनेकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे चेंगळ्याची स्टाइल अन् मोगराचा आवाज महाराष्ट्रात घुमत आहे.

Comments are closed.