रसायनीच्या ‘लखोबा लोखंडे’ला अटक, अनेक तरुणींना फसवले; मेट्रोमोनी साईटवर टाकायचा प्रेमाचे जाळे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोशल मीडियावर फसवणुकीचे अनेक नवीन प्रकार उघडकीस येत आहेत. मेट्रोमोनी साईटवर तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या रसायनीतील ‘लखोबा लोखंडे’ ला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आदर्श म्हात्रे ऊर्फ रुद्रेश गोंधळी असे या ३४ वर्षीय महाभागाचे नाव असून त्याने आतापर्यंत अनेक तरुणींना गंडा घातला आहे. तो तरुणींना कर्ज काढायला लावायचा व लाखो रुपये स्वतः उकळून पसार व्हायचा. विशेष म्हणजे त्याने असंख्य उच्चशिक्षित महिलांनाही ‘शिकार’ केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे.

सोशल मीडियावर आपली माहिती टाकायचा. फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवर तरुणींची ओळख काढायची आणि मेट्रोमोनी साईटच्या आधारे त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे असा फंडा त्याने अवलंबिला होता. यापूर्वी त्याला अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती, मात्र त्यानंतरही त्याचे कारनामे सुरूच होते. आतापर्यंत म्हात्रे या ‘लखोबा’ने शंभरहून अधिक महिला व तरुणींना फसवले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.

११ जणींनी केले धाडस

आदर्श म्हात्रे याच्या कारनाम्यांना कंटाळून आतापर्यंत ११ पीडित महिला आणि तरुणींनी धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये समजताच डोंबिवलीतील एका पीडित तरुणीनेही पुढे येत आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याची गंभीर दखल घेत मानपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करीत म्हात्रे याच्या मुसक्या आवळल्या.

Comments are closed.