टी20 वर्ल्ड कपमध्ये राशिद खानने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज!

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये इतिहास घडवत एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. राशिद खान हा टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 700 बळी (विकेट्स) घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. सोमवारी (16 फेब्रुवारी) अफगाणिस्तान आणि युएई (UAE) यांच्यात टी-20 विश्वचषकातील 28 वा लीग सामना खेळला गेला, ज्यामध्ये राशिदने युएईच्या मुहम्मद अरफानला बाद करून हा 700 विकेट्सचा टप्पा गाठला.
या सामन्यापूर्वी राशिदच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 699 विकेट्स होत्या. युएई विरुद्धच्या सामन्यात 16 व्या षटकात अरफानला बाद करत राशिदने ही ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण सामन्यात राशिदने एकच विकेट घेतली, पण ती त्याच्यासाठी विक्रमी ठरली. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्रावो 631 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राशिद खानने केवळ 518 टी-20 सामन्यांमध्ये आपले 700 बळी पूर्ण केले आहेत. दुसरीकडे, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ड्वेन ब्रावोने 582 सामन्यांत 631 बळी घेतले होते. अशा प्रकारे राशिदने ब्रावोच्या तुलनेत अत्यंत कमी सामन्यांमध्ये ही मोठी धावसंख्या गाठली आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या युएईच्या संघाने 20 षटकांत 9 बाद 160 धावा केल्या. युएईकडून शोएब खानने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 48 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला ओमरझाईने सर्वाधिक 4 बळी घेतले.
विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने 19.2 षटकांत 5 गड्यांच्या बदल्यात 162 धावा करत हा सामना जिंकला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक 53 धावा केल्या, तर ओमरझाईने नाबाद 40 धावांची खेळी केली. उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी अजमतुल्ला ओमरझाईला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Comments are closed.