राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 101 वर्षे पूर्ण होत आहेत
शुभेच्छांचा वर्षाव, स्वयंसेवकांनी केला नवा निर्धार
वृत्तसंस्था/ नागपूर, नवी दिल्ली
आज विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 101 वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. भारतातील या सर्वात मोठ्या हिंदू संघटनेची स्थापना 27 सप्टेंबर 1925 या दिनांकाला दसऱ्यादिवशी करण्यात आली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे या संघटनेचे संस्थापक आहेत. तेच संघटनेचे प्रथम सरसंघचालक होते. ही संघटना स्थापन करण्यासाठी डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी मोठे साहाय्य केले. तसेच भय्याजी दाणी, अप्पाजी जोशी, बाळासाहेब आपटे, बाळासाहेब देवरस आणि मधुकरराव भागवत हे या संघटनेचे आद्य कार्यकर्ते होते. त्यावेळी तरुण असणारे भाऊजी कावरे, अण्णाजी सोहनी, विश्वनाथराव केळकर आदी या संघटनेचे प्रथम स्वयंसेवक होते. आपल्या 101 वर्षांच्या इतिहासात या संघटनेने अनेक चढउतार सहन केले आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत हिंदूसंघटनाच्या आपल्या ध्येयापासून ढळायचे नाही, असा या संघटनेच्या स्वयंसेवकांचा दृढ निर्धार असल्याने प्रत्येक संकटावर मात करुन आज ही संघटना देशात अग्रस्थानावर विराजमान आहे.
गेल्या वर्षी या संघटनेने आपले शताब्दीपूर्तीवर्ष साजरे केले आहे. 101 वर्षांपूर्वी एका शाखेपासून प्रारंभ झालेली ही संघटना आता एक लाखांहून अधिक शाखांपर्यंत विस्तारलेली आहे. तसेच या संघटनेच्या स्वयंसेवकांनी, इतर अनेक क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने संघटना स्थापन केल्या असून त्यांच्यापैकी कित्येक संघटना त्या त्या क्षेत्रांमध्ये अग्रस्थानावर आहेत. भारतीय मजदूर संघ ही कामगार संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी संघटना, भारतीय किसान संघ ही शेतकरी संघटना तसेच विद्याभारती ही शिक्षण क्षेत्रातील संघटना आणि सेवाभारती ही सेवाकार्ये करणारी संघटना अशा अनेक अंगानी संघाने आपला सामाजिक प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. भारतीय जनसंघ जो सध्याच्या काळातील भारतीय जनता पक्ष आहे, त्याची स्थापनाही संघाच्या प्रेरणेनेच झाली असून हा राजकीय पक्ष केली सव्वाबारा वर्षे देशात सत्तेवर आहे. तसेच, अनेक राज्यांमध्येही या पक्षाच्या हाती बहुमताची सत्ता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या विविध क्षेत्रांमधील संघटना यांच्या एकंदर सदस्यसंख्या लक्षात घेतली, तर ती 2 कोटींपेक्षा अधिक आहे, असे अनुमान आहे. या संख्येवरुन या संघटनेच्या कार्यविस्ताराचा आवाका लक्षात येतो.
हिंदू संघटन हे ध्येय
विविध जाती-जमाती, भाषा, प्रथा आणि परंपरा, भौगोलिक विभाग आदींमध्ये विभागल्या गेलेल्या आणि पुष्कळदा एकमेकांमध्ये संघर्ष करणाऱ्या विविध हिंदू समाजघटकांना एकत्र आणणे आणि आपण प्रथम हिंदू आहोत, ही भावना त्यांच्यात निर्माण करणे, हे या संघटनेचे सर्वात महत्वाचे ध्येय आहे. मात्र, हे ध्येय संघर्ष किंवा हिंसा अशा मार्गांनी न साधता सेवाकार्ये, प्रबोधन आणि चर्चेच्या माध्यमातून साध्य करण्यावर या संघटनेने आजवर भर दिला आहे. त्यामुळे ही संघटना आज सर्वसामान्य हिंदूंच्या आदराचे आणि आस्थेचे स्थान बनली आहे.
Comments are closed.