राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक सुरू
इंदूरमध्ये 3 दिवस चालणार, महत्त्वाचे निर्णय होणार
वृत्तसंस्था/ इंदूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अखिल भारतीय कार्यकर्ता मंडल’ बैठकीला मध्यप्रदेशातील इंदूर येथे प्रारंभ झाला आहे. ही राष्ट्रीय बैठक तीन दिवस चालणार असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह संघटनेचे 400 प्रमुख नेते पूर्णकाळ उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची शताब्दी नुकतीच पूर्ण झाली आहे. या शताब्दी वर्षात संघटनेकडून कोणती कामे करण्यात आली, तसेच कोणते उपक्रम पूर्ण करण्यात आले यांचे सिंहावलोकन करण्यासाठी आणि भविष्यकाळातील योजना निर्धारीत करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या या द्वितीय शतकात संघटनेचा आणखी विस्तार कसा करता येईल, यावरही या बैठकीत विचारविमर्श करण्यात येणार आहे.
शताब्दी वर्षातील कार्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात देशभरातील संघशाखांच्या संख्येत 13 हजार हून अधिकची वाढ झाली आहे. तसेच देशभरात 65 हजारांहून अधिक हिंदू सम्मेलनांचे आयोजन करण्यात आले. हिंदूंची जनजागृती करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यांचे आयोजनही करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे.
या बैठकीचा उद्देश
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख सुनिल अंबेकर यांनी या बैठकीच्या उद्देशासंबंधी माहिती पत्रकारांना दिली. या बैठकीला संघाच्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांप्रमाणेच देशभरातील 11 क्षेत्रे आणि 46 प्रांतांमधील संघचालक, सहसंघचालक, कार्यवाह, सहकार्यवाह, प्रचारक आणि सहप्रचारक यांची उपस्थिती आहे. या बैठकीच्या अंतिम दिनी बैठकीची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
प्रथम दिनी काय घडले…
बैठकीच्या प्रारंभ दिनी शताब्दी वर्षात हाती घेण्यात आलेले उपक्रम, त्यांचे यश, उपक्रम चालविताना आलेले अनुभव आणि त्या अनुभवांमुळे मिळालेली शिकवण यांच्या संदर्भात विचारविमर्श करण्यात आला. भविष्यकाळात संघविस्तार करत असताना या अनुभवांचा मोठा उपयोग होईल, असे प्रतिपादनही करण्यात आले.
संघशाखांची संख्या एक लक्षपार
शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांच्या संख्येने 1 लाखाची मर्यादा पार केली आहे. आजमितीस देशात संघाच्या एकंदर 1 लाख 1 हजार 151 दैनंदिन शाखा चालतात. साप्ताहिक मीलन आणि मासिक मीलन यांच्यासह ही संख्या 1 लाख 10 हजार 849 पर्यंत पोहचली आहे. मागच्या 7 ऑक्टोबरच्या तुलनेत यावेळी संघाच्या शाखांची संख्या 13 हजारांहून अधिकने वाढली आहे.
संमेलनांना उत्स्फूर्त प्रतिसाद
शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात लहान-मोठ्या 65 हजार 660 हिंदू संम्मेलनांचे आयोजक केले. या सर्व संम्मेलनांना हिंदू जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संघाशी संबंध नसलेल्या हिंदू नागरिकांनीही या संम्मेलनांमध्ये मोठ्या संख्येने भाग घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. या वर्षात महिलांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांनाही मोठा प्रतिसाद लाभला. विद्यार्थी आणि युवकांनीही उत्साहाने संघाच्या कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. युवक, विद्यार्थी आणि महिलांच्या सहभागाचे कार्यक्रम यापुढच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अधिक प्रमाणात हाती घेतले जातील. अनेक महाविद्यालयांच्या परिसरांमध्येही कार्यक्रम झाले, अशी माहिती अंबेकर यांनी दिली.
संघविस्तावर मोठा भर देणार
ड भविष्यकाळात संघ आपल्या विस्ताराच्या दृष्टीने कार्यक्रम हाती घेणार
ड शताब्दी वर्षकाळात संघशाखांच्या संख्येत 13 हजारांहून अधिकची वाढ
ड शताब्दी वर्षातील हिंदू संमेलनांना देशभरातील हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Comments are closed.